बेळगावमध्ये मराठी नेत्यांना अटक करणे अयोग्य, सरकार पाठिशी

सीमावासियांच्या पाठिशी एकत्रितपणे उभे राहिले पाहिजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर ,१९ डिसेंबर/ प्रतिनिधी :-सीमाप्रश्नावरून नागपूर हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस आज वादळी ठरला. कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना आज कर्नाटकात जाण्यापासून कर्नाटक पोलिसांनी रोखले आहे. त्याचे जोरदार पडसाद आज सभागृहात उमटले.

विधान भवनाच्या पायऱ्यावर विरोधकांनी पन्नास खोके-एकदम ओके, अशी घोषणाबाजी करत सरकारला पुन्हा कोंडीत पकडण्यासाठी निदर्शने केली.

सीमावासियांच्या पाठिशी सर्वपक्षीयांनी एकत्रितपणे उभे राहिले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासंबंधी उपस्थित केलेल्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी निवेदन केले.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, मराठी माणूस आणि मराठीच्या अस्मितेशी निगडीत या विषयावर केंद्राने गांभीर्याने दखल घेऊन बैठक बोलविली. या बैठकीत राज्याने ठोस भूमिका घेतली.

केंद्रीय गृहमंत्री यांनी घेतलेल्या बैठकीत सीमेवर राज्यातील गाड्या अडविल्या जातात, ही बाब लोकशाहीला धरून नाही, ही माहिती दिली. कुठल्याही परिस्थ‍ितीत अशा प्रकारची घटना होऊ नये. हा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे या विषयावर सामंजस्याची भूमिका घ्यावी. कर्नाटकचे मुख्यमंत्री अणि गृहमंत्री यांच्या उपस्थितीत केंद्राने भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली आहे, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

सीमावासियांसाठी शासन सकारात्मक असून काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 48 गावांसाठी दोन हजार कोटींची सिंचन योजना मंजूर केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी सभागृहाला दिली.

दरम्यान, बेळगावमध्ये मराठी नेत्यांना अटक करणे अयोग्य आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात जाऊ दिले पाहिजे, असे म्हणत सीमावादावर सरकार पाठिशी असल्याचे आश्वासन दिले. शोकप्रस्तावानंतर अधिवेशनाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलावे. त्यांनी सीमावर्ती भागात ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडायला लावावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली. याप्रकरणी लक्ष घालून त्यांना तातडीने सोडायला लावू, असे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 19 : सीमावर्ती भागातील गावे आणि मराठी बांधवांच्या पाठीशी  राज्य सरकार खंबीरपणे आणि पूर्ण ताकदीने उभे आहे अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. तसेच सर्व सीमावर्ती भागातील गावांच्या विकासासाठी एक विशेष कार्यक्रम राज्य शासन हाती घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सीमावर्ती भागातील घडामोडींच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर श्री. फडणवीस यांनी निवेदन केले. सदस्य शशिकांत शिंदे, अभिजित वंजारी, जयंत पाटील यांनी या विषयावर भूमिका मांडली.

श्री फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य लोकशाही पद्धतीने आंदोलन करत होते. भारतीय राज्यघटनेने सर्वांना लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र कर्नाटक सरकारने या आंदोलकांना बळजबरीने अटक केली. या अटक केलेल्या लोकांना तत्काळ सोडविण्यासाठी हे सरकार कार्यवाही करेल”.

सीमावासीयांच्या प्रश्नांसंदर्भात दोन्ही राज्यांत सलोखा राहिला पाहिजे, यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हस्तक्षेप केला तसेच अन्याय थांबला पाहिजे यासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्या ट्विटर हँडलवर काही प्रक्षोभक ट्विट झाले. मात्र हे ट्विट कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी केले नसल्याने याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री श्री. शहा यांनी दिले असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले. तसेच राज्य शासनाने  राबविलेल्या विविध योजना, दिलेला निधी आणि प्रस्तावित केलेल्या योजनांबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली.