सुषमा अंधारेंविरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक; म्हणाल्या ‘मी राजीनामा द्यायला तयार पण…’

मुंबई ,१६ डिसेंबर / प्रतिनिधी :-शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संताबाबत केलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय चांगलाच आक्रमक झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी सुषमा अंधारेंविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. त्यांची पक्षामधून हकालपट्टी करा, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अशा मागण्यादेखील वारकऱ्यांकडून करण्यात येत आहे. वारकरी संप्रदायाने केलेल्या या विरोधानंतर सुषमा अंधारेंनी माफी तर मागितली, पण त्याचसोबत, ‘मी राजीनामा दिला आणि पक्षाच्या बाहेर पडले तर विरोधकांची पळता भुई थोडी करेन,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या आघाडीच्या नेत्या म्हणून सुषमा अंधारे यांनी गेल्या काही दिवसात भाजप विरुद्ध आक्रमक मते मंडळी आहेत. अशामध्ये त्यांनी भाजपवर टीका करताना, ‘रेड्याला शिकविण्याचे सामर्थ इथल्या संतांमध्ये आहे म्हणुन चमत्कार.… आरे तुम्ही रेंड्यांना शिकवले रे! पण माणसांना कुठे शिकवले?’ असे वक्तव्य केले होते. त्यावर वारकरी संप्रदायाने आक्रमक भूमिका घेतली. सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या की, “मी स्वयंघोषित कीर्तनकरांची माफी मागितली नाही. तर, जे खरे वारकरी आहेत, त्यांची माफी मागते. माझ्या त्या वाक्याचा अर्थ चुकीचा लावण्यात आला. तरीही, जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागते.”

पुढे त्या म्हणाल्या, “माझ्या पक्षाने जर मला येऊन सांगितले की, तुमच्यामुळे पक्षाला त्रास होतोय, तर ती वेळ मी येऊ देणार नाही. कारण, माझ्यासाठी माझा पक्ष डफावर महत्त्वाचा आहे. माझ्या पक्षासाठी जर मला काम करायचं असेल तर मी ते कुठूनही करेन. पण, मी जर पक्षाच्या बाहेर गेले तर त्याचा धोका हा सर्वात जास्त विरोधकांना असेल. पण, तरीही मी काय करावे हे सर्व पक्ष ठरवेल.”