गोवर प्रतिबंधासाठी तातडीने उपाययोजना व्हाव्यात – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

मुंबई ,१४ डिसेंबर / प्रतिनिधी :-राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे गोवर प्रतिबंधक उपाययोजना आणि लसीकरण मोहीम राबविण्यासंदर्भात गतीने कार्यवाही व्हावी, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आज मंत्री श्री. महाजन यांनी वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाची गोवर साथ रोग प्रादुर्भावाच्या अनुषंगाने बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी जोशी, हाफकिन इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापकीय संचालक सुमन चंद्रा, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, आयुक्त राजीव निवतकर, अवर सचिव महादेव जोगदंड, मुंबई महानगपालिकेचे अधिकारी डॉ. गायकवाड आदींची उपस्थिती होती.

यावेळी मंत्री श्री. महाजन यांनी राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय येथे गोवर प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्या-त्या जिल्ह्यातील गोवर रुग्णांची संख्या, विलगीकरण व्यवस्था, खाटांची संख्या, औषधांची उपलब्धता, आदीबाबत माहिती घेतली. अधिकाधिक लसीकरण होईल, यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत. गोवर प्रतिबंध बाबत जनजागृती व्हावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.सध्या राज्यातील विविध सर्वोपचार रुग्णालयात असणाऱ्या रुग्णाची संख्या, त्यांच्यावरील उपचार स्थिती आदींची माहिती त्यांनी घेतली.