राठोडांनी शपथ घेतल्याने तीव्र संताप:भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर सडकून टीका
मुंबई ,९ ऑगस्ट /प्रतिनिधी :- ठाकरे सरकारमध्ये एका वादग्रस्त प्रकरणामुळे वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले आमदार संजय राठोड यांच्या मंत्रिपदाची दुसरी कारकीर्द प्रचंड अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. राठोड यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये मंत्रिपदाची शपथ घेताच प्रचंड टीकेची झोड उठली. राठोडांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच क्षणाला भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर, मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे आणि काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी संजय राठोड यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर सडकून टीका केली.
पुजा चव्हाणला न्याय मिळालाच पाहिजे-खासदार सुप्रियाताई सुळे
संजय राठोड यांच्या मंत्रिपदाच्या शपथविधीवरून राजकारण सुरु झाले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की संजय राठोड हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना त्यांची मंत्रिपदावरून हाकालपट्टी करण्याची मागणी भाजपने केली होती. आज संजय राठोड यांना क्लीनचीट मिळाली असे सांगत सत्ताधारी भाजपनेच त्यांना मंत्री केले आहे. त्यामुळे भाजपने संजय राठोड आणि समस्त बंजारा समाजाची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली. तसेच पुजा चव्हाणला न्याय मिळालाच पाहिजे, यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू, असे त्या म्हणाल्या.

स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ ‘होम मेकर’ असू नयेत तर त्या ‘नेशन बिल्डर’ असाव्यात असं ते सांगतात. पण राज्यात मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली परंतू यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही. मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक आहे. राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय आहे, अशी भूमिका खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मांडली.
एकही महिला नेतृत्व मुख्यमंत्री महोदयांना सक्षम वाटलं नाही का? – शालिनी ठाकरे
भंडारा जिल्ह्यातील बलात्काराच्या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. राज्यातली निम्मी लोकसंख्या-कोट्यवधी मुली-महिला असुरक्षित आहेत. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिला आमदारांमध्ये ‘महिला व बाल विकास मंत्री’ म्हणून एकही महिला नेतृत्व मुख्यमंत्री महोदयांना सक्षम वाटले नाही का? असा सवाल करत मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी निषेध व्यक्त केला आहे.
अत्यंत दुर्दैवी, तरीही संघर्ष थांबणार नाही – चित्रा वाघ
संजय राठोड पुन्हा मंत्री झाला असला तरी त्याच्याविरोधातला माझा लढा सुरुच राहणार असल्याचे सांगत त्याच्याविरोधातला संघर्ष थांबणार नसल्याचा इरादा चित्रा वाघ यांनी आक्रमक बाणा दाखवत व्यक्त केला. पुजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणा-या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे, असे म्हणत माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. लडेंगे… जितेंगे… असे ट्विट त्यांनी केले आहे.
जनता सगळं बघत आहे – किशोरी पेडणेकर
मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतल्यावरून भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवले. यावेळी पेडणेकर यांनी ठाकरे सरकारच्या कार्यकाळात संजय राठोडांच्या राजीनाम्याचा आग्रह धरणाऱ्या चित्रा वाघ आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लक्ष्य केले. त्या बाईने (चित्रा वाघ) एकाचं मंत्रिपद घालवलं, मुलीच्या खुनावरून किती रान पेटवलं होतं. ज्याचं मंत्रिपद घालवलं आता भाजप त्यालाच पुन्हा मांडीवर घेत आहे. याचा अर्थ काय घ्यायचा? पण जनता हे सगळं बघत आहे, या सगळ्याचा हिशेब ठेवत आहे, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.
हे व्हाईटवॉश मंत्रीमंडळ आहे का : यशोमती ठाकूर
मंत्रिमंडळ विस्तार झालाय पण आश्चर्य म्हणजे एकही महिला त्यात नाही. याचा विनोद होऊ शकतो अशी कृती तिथे केलेली आम्हाला दिसतेय. भाजपची जी वॉशिंग पावडर आहे ही फारच कपडे आणि चरित्र साफ करते. चित्रा ताई वाघ आता काय कमेंट करणार याची मी वाट बघतेय. संजय राठोडांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. हे व्हाईटवॉश केलेलं मंत्रिमंडळ आहे का. बघुयात काय होतंय, असे माजी मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी म्हटले.