छत्रपती शिवरायांच्या अपमानाविरोधात पुणे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; भाजप वगळता इतर सर्व संघटनांचा पाठिंबा

पुणे ,१३ डिसेंबर /प्रतिनिधी :-मराठा संघटना संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना आणि विरोधी पक्षांसह सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकरांनी मंगळवारी पुणे बंद पाळला आहे. यादरम्यान मूकमोर्चा काढण्यात आला. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केल्यानंतर मूक मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले हे देखील सहभागी झाले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात हा मोर्चा काढण्यात आला.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा विरोध म्हणून पुण्यामध्ये कडकडीत बंदची हाक दिली होती. या बंदला भाजप वगळता इतर सर्व पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतरही त्यांच्यावर भाजपने कारवाई केली नाही. त्यानंतर संतप्त शिवप्रेमींनी ही बंदची हाक दिली होती.

विशेष म्हणजे, निषेध म्हणून काढण्यात आलेल्या मूक मोर्चामध्ये भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनीदेखील उपस्थिती दर्शवली. शहरातील बहुतांश दुकाने, हाॅटेल सकाळपासून बंद होती. बंदमुळे शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पदावरून हटवण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

पुण्यातील बंदला मोठा प्रतिसाद मिळत असून यामध्ये अनेक संघटनानी ‘राज्यपाल हटाव’च्या घोषणा दिल्या. तसेच, यावेळी काढण्यात आलेल्या मूक मोर्चामध्ये भाजपचे खासदार उदयनराजे भोसले सहभागी झाले होते. त्यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदींना पत्र लिहून राज्यपाल कोश्यारी यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. तर, दुसरीकडे छत्रपती संभाजीराजे यांनीदेखील पुण्यातील या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. या पुण्यातील बंदमध्ये महाविकास आघाडीतीळ नेत्यांसह अनेक सामाजिक संघटना सहभागी झाले आहेत. यामध्ये अनेक महिलांसह अंदाजे ४० मुस्लिम संघटनादेखील सहभाग दर्शवला आहे.

अनेक सामाजिक, व्यापारी संघटनांचा बंदला पाठिंबा मिळाला आहे. फेडरेशन ऑफ ट्रेडर्स असोसिएशन ऑफ पुणे (एफएटीपी) चे अध्यक्ष फतेहचंद रांका म्हणाले होते, “आम्ही राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि व्यापाऱ्यांना बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन करतो.” सर्व दुकाने आणि कार्यालये दुपारी ३ वाजेपर्यंत बंद होती.

मोर्च्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लाल महाल याठिकाणी मोर्चाचा समारोप केला जाणार आहे. विविध संघटनांनी आजच्या पुणे बंदला पाठिंबाही दिला आहे. यावेळी पुण्यातील मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला.