शरद पवार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा:नरेंद्र मोदींचे भाषण हे एखाद्या पंतप्रधानांसारखे नव्हते तर एखाद्या नेत्यासारखे 

कापड गिरणी कामगाराचा मुलगा सांगणं हा चंद्रकांत पाटील यांचा कांगावा -शरद पवार

मुंबई ,१२ डिसेंबर / प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ८२वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी वाढदिवसानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादीकडून खास कार्यक्रमांच आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरदेखील टीका केली. ‘नरेंद्र मोदींचे नागपूरमधील भाषण हे एखाद्या पंतप्रधानांसारखे नव्हते तर एखाद्या नेत्यासारखे होते.’ असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. तर, वादग्रस्त वक्तव्य करुन वरती कापड गिरणी कामगाराचा मुलगा सांगणं हा चंद्रकांत पाटील यांचा कांगावा असल्याची टीका शरद पवार यांनी केली.

शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपुरातील भाषणावर टीका केली. “जाहीर सभेला गेले, निवडणूक प्रचारात गेले तर तेव्हा टीका करायचा अधिकार आहे. पण रेल्वे उद्घाटन हा सरकारी कार्यक्रम, हॉस्पिटल उद्घाटन हा सरकारी कार्यक्रम. अशा कार्यक्रमांना पंतप्रधान म्हणून विरोधकांवर टीका करतात हे किती शहाणपणाचे आहे? हे कळायची वेळ आली आहे” असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.

तर दुसरीकडे, “शाईफेकीचे समर्थन मी करणार नाहीच. पण, ते जरा तसे बोलले नसते तर हे सर्व घडलंच नसत. महात्मा फुले, डॉ. बाबसाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत भीक शब्द वापरला. हे कोणाच्याच पसंतीस पडणार नाही. महाराष्ट्रात छोट्या घरातून आलेली किती मुले सत्तेच्या उच्चपदस्थ खुर्चीवर जाऊन बसली आहेत, अशी अनेक उदाहरणे आहेत. चंद्रकांत पाटलांचा हा केवळ कांगावा सुरु आहे.” अशी टीका त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना केली.

वाढदिवसानिमित्त शरद पवार यांचे संपूर्ण भाषण 

आज वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटरला आयोजित कार्यक्रमात सर्वांनी माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला त्याबद्दल सर्वांचे आभार.

८२ वर्ष संपून ८३ व्या वर्षात पदार्पण करतोय याची आठवण तुम्ही मला का करून देताय हे लक्षात येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक कर्तुत्ववान नव्या पिढीचे प्रतिनीधी आहेत. त्यांच्यामार्फत राज्याचा गाडा नीटनेटका चालवावा अशी अपेक्षा ठेवली तर काही चुकीचे नाही असे कर्तुत्व त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे साहजिकच अशांना प्रोत्साहित करण्याची भूमिका ही आम्ही लोकांनी घेतली पाहिजे, यातच आम्ही लक्ष द्यावे याची जाणीव करून देण्यासाठीच हा सोहळा याठिकाणी आयोजित केला असावा. मी व माझ्या आसपासच्या वयाच्या सर्व घटक नव्या पिढीला प्रोत्साहित करण्याची भूमिका ही अखंडपणाने केल्याशिवाय राहणार नाही.

आज अडचणीच्या काळातून आपण जात आहोत. देशात भाजपचे राज्य आहे. लोकशाहीच्या मार्गाने राज्य आल्यानंतर त्याला विरोध करायचा नसतो. धोरण पसंत पडली नाही व ती समाजहिताची नसतील तर त्यासंबंधीची भूमिका घ्यायची असते. पण राज्यकर्त्यांनी सुद्धा संपूर्ण देशातील प्रांतांकडे बघताना आपण देशाचे नेतृत्व करतोय याचे स्मरण केले पाहिजे.

काल नागपूर येथे प्रधानमंत्र्यांनी केलेल्या भाषणात त्यांनी फार मोठ्या प्रमाणात विरोधकांवर टीका केली. जाहीर सभेला किंवा निवडणुकीच्या प्रचाराला गेले तिथे पक्षाची भूमिका मांडणे हा त्यांचा अधिकार आहे. परंतु रेल्वे, रस्ता, हॉस्पीटल अशा सरकारी कार्यक्रमाचे उद्घाटन देशाचा प्रधानमंत्री करतो. त्या व्यासपीठावर विरोधकांवर टिकाटिप्पणी मांडणे कितपत शहाणपणाचे आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

मी अनेक प्रधानमंत्र्यांची कार्यक्रम पाहिले व भाषणंही ऐकली. निवडणुकीच्या प्रचाराला गेल्यानंतर सुद्धा विरोधीपक्षाची सरकारं असली तर त्यांच्यावर कधी जवाहरलाल नेहरूंनी टिप्पणी केली नाही. आपली भूमिका मांडली पण विरोधक, विरोधी पक्षनेते, विरोधी पक्ष हा सुद्धा लोकशाहीच्या संस्था आहेत त्या संस्थांचा सन्मान ठेवला पाहिजे हे सूत्र या देशाच्या स्वातंत्र मिळाल्यानंतर बहुतेक प्रधानमंत्र्यांनी पाळले. पण आजकाल पाळलं जात नाही.

मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री असो त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या की समृद्धी मार्गाला विरोधकांनी विरोध केला पण मला माहिती नाही कोणी व कुठे विरोध केला.

राज्यात शिक्षण मंत्र्यांवर शाईफेक झाली या प्रकाराचे समर्थन मी करणार नाही. हे योग्य नाही. विरोधकांवर टीका करण्याचा अधिकार त्यांना आहे तसाच सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचा अधिकार आपल्यालाही आहे. पण टीका करणे याचा अर्थ कोणाच्या अंगावर शाई टाकणे हा नाही. पण शिक्षणमंत्र्यांनी महापुरुषांबद्दल भीक हा शब्द वापरणे कोणालाही पसंद पडणारे नाही. महापुरुषांचे संपूर्ण आयुष्य सबंध देशाला माहिती आहे. अशा महापुरुषांविषयी बोलताना भीक मागणे हा शब्द वापरला नसता तर चांगले झाले असते.

झालेल्या गोष्टी झाल्या तरी लगेचच सांगून टाकले की मी एका गिरणी कामगाराचा मुलगा आहे म्हणून हे केले. पाच वर्ष तुम्ही राज्याचे मंत्री होतात, पक्षाचे अध्यक्ष होता, आताही मंत्रिमंडळात मंत्री आहात आणि एखाद्या सामान्य कुटुंबातील व्यक्ती सत्तेपर्यंत पोहचली हे उदारहण केवळ तुमचेच नाही. अशी कितीतरी उदारहण सांगता येतील जे सामान्य स्थितीतून आले व सत्तेच्या महत्त्वाच्या शिखरावर गेले. त्यांच्यावर टिकाटिप्पणीही झाली. मात्र त्यांनी हा कांगावा केला नाही की मी या कुटुंबात जन्माला आलो म्हणून माझ्याबद्दल काही टिप्पणी केली आहे. हे दुर्दैव आहे असे झाले नसते तर चांगल झालं असतं.

राज्यात सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या सर्व सहकारी मित्रांना ते कोणत्याही पक्षाचे असोत पण राजकाणात मतभेद होतील त्यात शाई टाकणे वा तत्सम कार्यक्रम आपण कधी करणार नाही अशी भूमिका आपण घेऊ. महाराष्ट्राची एक संस्कृती आहे तिचा लौकीक टिकवण्याची काळजी आपण घेऊ.

आपण एकसंघ राहून राज्य सर्व दृष्टीने पुढे नेण्यासाठी जे जे करता येईल ते अखंडपणे करत राहूया व देशाचे महत्त्वाचे राज्य म्हणून महाराष्ट्राचा नावलौकीक वाढेल याची काळजी घेऊया. यासाठी सर्वांची साथ निश्चित मिळेल अशीच अपेक्षा व्यक्त करतो तसेच तुम्हा सर्वांच्याप्रति कृतज्ञता याठिकाणी व्यक्त करतो.