बीसीसीआयचा महत्त्वपूर्ण निर्णय,’या’ देशात आयपीएल होणार

मुंबई,२९ मे /प्रतिनिधी :- आयपीएल 2021च्या उर्वरित सामन्यांसंदर्भात आज बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये उर्वरित 31 सामने कधी आणि कुठे घ्यायचे याबाबत चर्चा करण्यात आली. कोरोना व्हायरसमुळे अचानक स्थगित झालेली आयपीएल 2021   स्पर्धा  कुठे होणार? यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. या स्पर्धेसाठी युएई, इंग्लंड आणि श्रीलंका हे तीन प्रस्ताव होते. बीसीसीआयच्या मुंबईमध्ये होणाऱ्या विशेष बैठकीत देखील हा विषय मुख्य अजेंड्यावर होता. अखेर आयपीएल स्पर्धेतील उर्वरित 31 सामने युएईमध्ये होणार आहेत. 

19 किंवा 2०  सप्टेंबर रोजी आयपीएल स्पर्धेला सुरुवात होऊ शकते. चार क्वालिफायर, सात डबल हेडर (एकाच दिवशी दोन मॅच) आणि दहा सिंगल हेडर (एकाच दिवशी एक मॅच) असे उर्वरित आयपीएल स्पर्धेचे स्वरुप असेल. आयपीएल स्पर्धेची सुरुवात वीकेंडला होईल आणि फायनल देखील वीकेंडला होण्याची शक्यता आहे.कोरोनामुळे भारतात ही स्पर्धा होणार नसल्याचे याआधीच स्पष्ट झाले होते. अबूधाबी, दुबई, शारजाह या तीन ठिकाणी हे सामने होतील, अशी माहिती आहे.

यापूर्वी गेल्या वर्षी देखील कोरोना व्हायरसमुळे आयपीएल स्पर्धा युएईमध्ये झाली होती. टीम इंडियाचा इंग्लंड दौरा 14 सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्यानंतर विशेष विमानाने इंग्लंड दौऱ्यावर गेलेले टीम इंडियाचे खेळाडू युएईमध्ये दाखल होतील.