शासनाच्या गॅझेटीयर संपादक मंडळात डॉ. पृथ्वीराज तौर यांची पुनर्नियुक्ती 

नांदेड ,८ डिसेंबर /प्रतिनिधी :-महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र जिल्हा दर्शनिका संपादक मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय आज जाहीर करण्यात आला. पुनर्रचित संपादक मंडळात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठीचे प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. 

प्रधान सचिव अथवा सांस्कृतिक कार्य सचिव हे संपादक मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात तर दर्शनिका विभागाचे सचिव डॉ. दिलीप बलसेकर सदस्य सचिव आहेत. अशासकीय सदस्यांमध्ये भाषा अभ्यासक डॉ. पृथ्वीराज तौर यांच्यासह ज्येष्ठ संशोधक डॉ. गो.ब. देगलूरकर, डॉ. सायली पलांडे, डॉ. प्रदीप आपटे, डॉ. सुरेश गरसोळे, डॉ. गिरीश मांडके, डॉ. अंबरीश खरे यांच्यासह एकूण १५ सदस्यांचा समावेश आहे. पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी ही नियुक्ती असणार आहे. 

डॉ. पृथ्वीराज तौर हे मागील १८ वर्षांपासून नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. कवी, अनुवादक, भाषा अभ्यासक व संशोधक अशी त्यांची ओळख आहे. त्यांची एकूण तीस पुस्तके प्रकाशित आहेत. डॉ. पृथ्वीराज तौर यांची यापूर्वीही २०१८ मध्ये महाराष्ट्र गॅझेटीयरच्या संपादक मंडळात नियुक्ती करण्यात आली होती. 

डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या पुनर्नियुक्तीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, अधिष्ठाता डॉ. एल. एम. वाघमारे, डॉ. अजय टेंगसे, डॉ. राजाराम माने, डॉ. वैजयंता पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, कार्यकारी अभियंता तानाजी हुसेकर यांनी अभिनंदन केले आहे.