महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांविरूद्ध महाविकास आघाडी काढणार १७ डिसेंबर रोजी विराट मोर्चा

मुंबई ,​५​ डिसेंबर  / प्रतिनिधी :- १७ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांविरूद्ध विराट मोर्चा महाविकास आघाडी काढणार आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासमवेत समाजवादी पक्ष, कपिल पाटील, जयंत पाटीत शेतकरी कामगार पक्ष अशा सर्व घटक पक्षांची आम्ही चर्चा केलेली आहे. ते सर्व पक्ष या मोर्चात सहभागी होणार आहे, अशी माहिती विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

राज्यपाल आणि राज्यकर्त्यांकडून सातत्याने महाराष्ट्राचा अवमान केला जात आहे, शिवरायांबद्दल सातत्याने बेताल विधाने केली जात आहेत, सीमावर्ती गावांवर कर्नाटक दावा करत आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला बाधा येत आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. या पार्श्वभूमीवर 17 तारखेला जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक झाली.

उद्धव ठाकरे म्हणाले, “राज्यात अस्तित्वात आलेल्या बेकायदेशीर सरकारमुळे राज्याची अस्मिता कलंकित होत आहे. राज्यपालांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडा जात आहे. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनीही सीमेवरच्या गावांवर दावा केला आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या विधानामुळे महाराष्ट्राची अस्मिता कलंकित होत आहे. उद्योग गुजरातला पळून गेले. कर्नाटकात पुढच्या वर्षी निवडणुका असल्याने राज्यातील उद्योग आता कर्नाटकात जाणार का?

17 रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार

महाराष्ट्राचा सातत्याने अपमान होत असल्याने आता महाराष्ट्राच्या ताकदीचे भव्य दर्शन घडवले पाहिजे. जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा निषेध मोर्चा काढण्यात येणार असून त्यात सर्वांनी सहभागी व्हावे. हा केवळ राजकीय प्रश्न नसून राज्याच्या स्वाभिमानाचा प्रश्न असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांचा सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांकडून होणार सातत्याने अपमान, राज्यपाल महोदयांची शिवाजी महाराजांबद्दलची बेताल वक्तव्ये याचा निषेध व राज्यपालांना हटवा अशा भूमिका या मोर्चात मांडण्यात येणार आहेत. जरी राज्यपाल महोदयांना ८ किंवा १७ डिसेंबर २०२२ तारखेच्या आधी केंद्र सरकारने राज्यपाल पदावरून हटवले तरी देखील हा मोर्चा निघणारचं आहे, असे अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात नांदेड जिल्ह्यातील देगलूर मधील गावं तेलंगणामध्ये जायचं असे कधी यापूर्वी म्हणाली नाहीत पण ती आज बोलायला लागली. सांगली जिल्हातील जतमधील तर सोलापूरमधील अक्कलकोटमधील ग्रामस्थ कर्नाटकमध्ये जाण्याची भाषा करतात. एवढेच नव्हे तर नाशिक-नंदुरबारमधील गुजरात बॉर्डरच्याजवळील आदिवासी भागातील लोक देखील महाराष्ट्रातून वेगळं होयचे असे बोलायला लागली. आतापर्यंत महाराष्ट्र राज्यात जेवढे मुख्यमंत्री झालेत त्यांच्या काळात अशा बॉर्डरजवळील तालुक्यातील लोकांनी वेगळे होण्याची इच्छा व्यक्त केली नव्हती, असे अजितदादा यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले, तिथे नेहमी लक्ष दिले जात होते. अशोकराव चव्हाण पालकमंत्री होते डीपीसीमध्ये तरतूद केली होती तिकडे लक्ष दिले जायचे. ती तरतूदपण थांबवली. सांगली जिल्ह्यात जयंत पाटील यांनी यांनी तरतूद केली ती थांबवली. नाशिक-नंदूरबार जिल्ह्यात छगन भुजबळ यांनी तरतूद केली त्याला स्थगिती दिली. स्थगिती दिल्यामुळे तिथे असंतोष निर्माण झाला. असे कधी राज्यामध्ये घडत नव्हते. हे मुद्दे देखील या मोर्चात समाविष्ट आहेत. त्याचबरोबर महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवर या मोर्चात आवाज उठवण्यात येणार आहे, अशी माहिती अजितदादांनी दिली.

महाराष्ट्र-कर्नाकट सीमाप्रश्नामुळे वादाची ठिणगी पडली. त्यामुळे महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या भागांतील गावांनी वेगळे होण्याची मागणी केली. आमच्या सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात असे कधीच घडले नाही. हे आताच्या सरकारचे अपयश आहे, अशी टीका अजितदादा यांनी केली.