महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आता सर्वांसाठी

कोविड-19 च्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने युध्द पातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. राज्यातील सर्व जनतेला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देणारे देशातील महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरले आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार राज्यामध्ये काही ठिकाणी शासकीय रुग्णालये कोविड-19 रुग्णालये म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत. या पार्श्वभूमीवर कोविड-19 रुग्णांना अंगीकृत खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी आर्थिक बोजा पडू नये, कोविड-19 महामारीच्या संकटामध्ये सर्वच नागरिकांना आरोग्य विषयक हमी आणि आर्थिक दिलासा मिळावा यासाठी मर्यादित कालावधीसाठी योजनेची व्याप्ती सर्व नागरिकांसाठी वाढविण्याचा प्रस्ताव राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून प्राप्त झाला. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील उपचाराचा लाभ लाभार्थी रुग्णांबरोबर इतर रुग्णानांदेखील मिळावा आणि शासकीय रुग्णालयाकरिता राखीव असलेल्या उपचार पध्दती उपलब्ध व्हाव्यात व योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयातील डॉक्टर, इतर कर्मचारी व अनुषंगिक कर्मचारी यांना कोविड-19 साथरोग प्रतिबंध संदर्भात आवश्यक साधन सामग्री उपलब्ध व्हावी. यासाठी हा क्रांतीकारी निर्णय घेण्यात आला.

कोविड-19 उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य परिस्थितीचा विचार करून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत कोरोनाबाधित रुग्णांवर उपाचार करण्याकरिता लाभार्थी रुग्णांबरोबर राज्यातील सदर योजनेचे लाभार्थी नसलेल्या इतर रुग्णांनादेखील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत अंगीकृत खाजगी रुग्णालयामध्ये कोविड-19 साठी उपचार अनुज्ञेय असणार आहेत. राज्य आरोग्य हमी सोसायटीने विहित कार्यपध्दतीनुसार कार्यवाही करावी. (लाभार्थ्यांला रहिवासी पुरावा म्हणून वैध पिवळी, केशरी, शुभ्र शिधापत्रिका, तहसिलदार यांचा दाखला व अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक पुरावाजन्य कागदपत्र सादर करावे लागेल. त्याबरोबरच शासनमान्य फोटो ओळखपत्र देणे आवश्यक राहील. कोरोनाच्या साथीचे गांभीर्य, उपचाराची तातडी पाहता उपचारासाठी आवश्यक कागदपत्राबाबत शिथिलता देण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य आरोग्य हमी सोसायटी, वरळी, मुंबई यांना देण्यात आले आहेत.

सद्यस्थितीत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत 996 उपचार व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत 1 हजार 209 उपचार पुरविले जात असून याचा लाभ राज्यातील 2.23 कोटी कुटूंबांना मिळत आहे. या अंतर्गत राज्यातील सुमारे 85 टक्के लोकसंख्येचा समावशे होतो. तथापि राज्यातील कोविड-19 उद्रेकाची सद्यस्थिती पाहता सद्यस्थितीत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत समाविष्‍ट नसलेल्या राज्यातील रहिवासी असलेल्या उर्वरित नागरिकांना सुध्दा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत अनुज्ञेय 996 उपचार पध्दतीचा लाभ मान्यता प्राप्त दराने अंगीकृत रुग्णालयामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शासकीय रुग्णालयाकरिता राखीव असलेल्या 134 उपचारापैकी सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व श्रवणयंत्राचा उपचार वगळता 120 उपचार अंगीकृत खाजगी रुग्णालयांना 31 जुलै 2020 पर्यंत मान्यता प्राप्त दराने देण्यात यावेत. योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या खर्चाची प्रतीपूर्ती विमा कंपनीकडून व योजनेंतर्गत लाभार्थी नसलेल्या कुटूंबाच्या उपचाराची खर्चाची प्रतिपूर्ती संबंधित रुग्णालयास राज्य शासनाद्वारे राज्य आरोग्य हमी सोसायटी, वरळी, मुंबई यांच्यामार्फत हमी तत्वावर करण्यात येईल.

किरकोळ व काही मोठे उपचार व तपासण्या ज्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट नाही. त्या उपचार व तपासण्या सदरील योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये सर्व लाभार्थ्यांना (योजनेंतर्गत लाभार्थी असलेले व लाभार्थी नसलेले) CGHS च्या दरानुसार (NABH/NABL) उपलब्ध करून देण्यात येतील. सदर खर्चाची प्रतीपूर्ती संबंधित रुग्णालयास राज्य शासनाद्वारे राज्य आरोग्य हमी सोसायटी, वरळी, मुंबई यांच्यामार्फत हमी तत्वावर करण्यात येईल.

कोविड-19 साठी शासनाने जाहीर केलेल्या खाजगी अंगीकृत रुग्णालयांकडून कोरोना संशयीत रुग्णांवर उपचार करण्याकरिता पीपीई किटस् व एन-95 मास्कचा आवश्यक वापर करण्यात येईल. त्या प्रमाणात प्रत्यक्ष शासनाने ठरविलेल्या दरानुसार निधी देण्यात येईल. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत सनियंत्रण केले जाईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित जिल्हा शल्य चिकित्सक यांची राहील. तसेच प्रतीपूर्ती करण्यापूर्वी सर्व बाबी तपासून अनावश्यक आर्थिक भार पडणार नाही, याची खबरदारी मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य आरोग्य हमी सोसायटी यांची राहील. योजनेची अंमलबजावणी राज्य आरोग्य हमी सोसायटीने योजनेची मार्गदर्शक तत्वे, अटी व शर्तीनुसार करावी. सदर योजना 31 जुलै 2020 पर्यंत अंमलात राहील. तद्नंतर याबाबत आढावा घेऊन मुदतवाढीचा निर्णय शासनस्तरावरून घेण्यात येणार आहे.

सर्व जनतेला याद्वारे आवाहन करण्यात येते की, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमार्फत कोविड-19 साठी सर्व जनतेला उपचाराची सोय करण्यात आली आहे. जनतेने या योजनेचा योग्य तो लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *