चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणास शासनाची मान्यता

करमाड येथील रेल्वे दुर्घटनेतील मृत मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नियमांच्या अधीन राहून परवानगी

मुंबई दि ३१: कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटसृष्टीतील संपूर्ण कामे ठप्प झाली होती, आता काही अटी-शर्तींच्या अधीन राहून चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिकांच्या चित्रीकरणास शासनाने मान्यता दिली आहे, याबाबतचा शासन निर्णय आज सांस्कृतिक कार्य विभागाने जारी केला आहे.

गेल्या आठवड्यात मुंबईतील चित्रपट निर्माते, कलाकार तसेच ब्रॉडकास्टिंग फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चित्रपटसृष्टीतील कामे आणि चित्रीकरणास परवानगी देण्याची विनंती केली होती. आज यासंदर्भात अटी-शर्तींच्या अधीन राहून शासनाने चित्रीकरणास परवानगी दिली आहे.

निर्मात्यांना आता निर्मितीपूर्वीची आणि निर्मितीनंतरची कामे शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार करता येणार आहेत. कोविडसंदर्भात लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक सूचना या चित्रीकरणासाठी देखील लागू राहणार असून नियमांचा भंग केल्यास कामे बंद करण्यात येणार असल्याचेही या शासन निर्णयात स्पष्ट केले आहे.

मुंबईत चित्रीकरण परवानगीसाठी निर्मात्यांना व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, आणि सांस्कृतिक विकास महामंडळ , दादासाहेब फाळके चित्रनगरी , गोरेगाव यांच्याकडे तसेच उर्वरित जिल्ह्यांसाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *