किल्ले प्रतापगडाच्या सौंदर्यामध्ये कोणतीही बाधा येणार नाही असा आराखडा तयार करा- पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, ३ डिसेंबर / प्रतिनिधी :- किल्ले प्रतापगडचे संवर्धन करताना त्याच्या सौंदर्यामध्ये कोणतीही बाधा येणार नाही याची दक्षता घेऊन आराखडा तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या.

            जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात किल्ले प्रतापगड संवर्धन व महाबळेश्वर सुशोभीकरण आराखडा संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री श्री. देसाई बोलत होते. या बैठकीला पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील आदी उपस्थित होते.

            किल्ले प्रतापगडचा आराखडा तयार करताना सर्व बाबींचा विचार करावा, अशा सूचना करुन प्रतापगडावर येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध सुविधांचाही आरखड्यात प्रामुख्याने समावेश करावा. तसेच किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला सुसज्ज असे वाहन तळ अन्य सुविधांचाही आराखड्यात समावेश असावा. पर्यटकांना किल्ले प्रतापगडावर पिण्याच्या पाण्याची सोय करावी, यासाठी जिल्हा परिषदेने पाण्याचा स्त्रोत पाहून पाणी साठा करण्याची योग्य व्यवस्था करावी, अशा सूचनाही  पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.

            तसेच साबणे रोड सोडून महाबळेश्वर पर्यटनाची  मंजुर कामे तातडीने सुरु करावीत. सुरु असलेली कामे नागरिकांना माहिती व्हावी यासाठी संपूर्ण माहितीचा फलक चौकात उभा करावा, अशा सूचना करुन या विकास कामांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी केले.