ज्येष्ठ लेखक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

पुणे , ३० नोव्हेंबर / प्रतिनिधी :- ज्येष्ठ लेखक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दुपारी २ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

मराठी ग्रामीण साहित्यात त्यांचे मोठे योगदान आहे. ग्रामीण कथालेखक, कादंबरीकार, कवी, समीक्षक अशी त्यांची ओळख आहे. ‘राजधानी’, ‘वारसा’, ‘सावित्रीचा निर्णय’ या त्यांच्या दीर्घकथा प्रसिद्ध आहेत. ‘गांधारीचे डोळे’, ‘मध्यरात्र’, ‘पराभव’ या त्यांच्या कादंबऱ्या मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत.

महात्मा फुले यांज्या जीवनावरील डॉ. कोत्तापल्ले यांचा ‘ज्योतीपर्व’ हा ग्रंथ त्यांच्या सामाजिक व परिवर्तनवादी विचारांची साक्ष देतो. साहित्यसेवा करतानाच त्यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारी देण्यात आली. ही जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

डॉ. कोत्तापल्ले तसे मराठवाड्यातले. नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षणही मराठवाड्यातच पूर्ण झाले. मराठीच्या पदव्युत्तर परीक्षेत ते तत्कालीन मराठवाडा विद्यापीठात सुवर्णपदकाचे मानकरी ठरले होते. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बीड येथील बंकटस्वामी महाविद्यालयात नोकरीला सुरुवात केली. त्यानंतर ते औरंगाबादला विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक झाले. १९९३च्या सुमारास ते पुणे विद्यापीठात प्राध्यापक बनले. तेथे ते विभागप्रमुख असताना त्यांची औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नेमणूक झाली.

विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागात शिक्षण घेताना त्यांनी मराठवाडा साहित्य परिषदेत नोकरी केली. साहित्य परिषदेच्या खोलीत राहून शिक्षण पूर्ण केले. त्यामुळे शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडीअडचणींची त्यांना जाणीव होती. या जाणिवेतूनच त्यांनी ‘कमवा व शिका’ ही योजना बळकट करताना विद्यार्थ्यांचे मानधन वाढवले. त्यांच्या निर्णयाचा शेकडो विद्यार्थ्यांना लाभ झाला.

कॉपीमुक्ती अभियान यशस्वी करणारे ते एकमेव कुलगुरू ठरले. कॉपीमुक्तीसाठी त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेले पत्र फार प्रभावी ठरले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्त कॉपीमुक्ती स्वीकारली. विद्याथीर् संघटना व विद्यापीठ प्रशासन यांच्यात समन्वय निर्माण करण्यात डॉ. कोत्तापल्ले यांना यश आले.

स्वतंत्र प्रतिभेचा, समाजजीवनाशी एकरूप कृतिशील साहित्यिक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ साहित्यिक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली

मुंबई :- ‘समाजजीवनाशी एकरूप होऊन आपल्या लेखनातून मराठी साहित्यात मोलाची भर घालणारा स्वतंत्र प्रतिभेचा, कृतिशील साहित्यिक गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, डॉ.कोत्तापल्ले यांचा मराठीचे शिक्षक ते कुलगुरू, साहित्य संमेलनाध्यक्ष आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध भूमिका बजावणारे व्यक्तीमत्व हा प्रवास महत्त्वाचा आहे. मराठी साहित्य चळवळ समृद्ध व्हावी यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. यासाठी शासनाच्या विविध समित्यांच्या माध्यमातून काम केले. होतकरू, नवोदित साहित्यिकासाठी मार्गदर्शनसाठी ते आधारवड होते. भूमिका घेऊन लिहिण्याची स्वतंत्र शैली यामुळे त्यांची साहित्य संपदा निश्चितच पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरेल. अशा आपल्या वैविध्यपूर्ण साहित्यकृतींनी त्यांनी मराठी साहित्य विश्व समृद्ध केले आहे. त्यांच्या निधनामुळे साहित्यिक क्षेत्राची हानी झाली आहे, त्यांच्या सारख्या व्यासंगी आणि कृतीशील साहित्यिकाची उणीव भासत राहील.ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!’

समाजमनाची नस अचूक पकडणारा साक्षेपी लेखक आपण गमावला-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आपल्या लेखनातून समाजमनाची नस अचूक पकडणारा साक्षेपी लेखक आपण गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस शोकसंदेशात म्हणतात, डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांनी विविध लेखनप्रकारांतून मराठी साहित्य विश्वात स्वतःचा अमीट ठसा उमटविला. एक कवी, कथाकार, कादंबरीकार, समीक्षक, संपादक आणि अनुवादक अशा  विविध भूमिकांमधून त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले. मराठी विकास संस्था, साहित्य अकादमी, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक तसेच विद्यापीठांमध्ये मराठी अभ्यास मंडळांच्या माध्यमातून देखील त्यांनी मराठीची केलेली सेवा मार्गदर्शक अशीच आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले डॉ. कोत्तापल्ले आपल्या भूमिकेवर, विचारांवर कायम ठाम राहिले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले कार्यदेखील अतिशय उल्लेखनीय होते. एक उत्तम मार्गदर्शक, प्रशासक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व त्यांच्या निधनाने आपण गमावले आहे.

माजी कुलगुरु प्राध्यापक नागनाथ कोतापल्ले यांच्या निधनाने अभिजात लेखणी शांत झाली – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

ज्येष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तसेच मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्राध्यापक नागनाथ कोतापल्ले यांच्या निधनाने अभिजात लेखणी शांत झाली आहे, या शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

श्री. मुनगंटीवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समीक्षा या साहित्यप्रकारांमध्ये मुशाफिरी करणाऱ्या प्रा. कोतापल्ले यांनी आपल्या लेखनातून समाजाला दिशा देत नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली. साहित्यिक म्हणून ते जितके परिचित होते तितकाच त्यांनी कुलगुरु पदावर आपला ठसा उमटवला. एक अध्यापनकुशल आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणूनही ते प्रसिद्ध होते. मराठी ग्रामीण साहित्यात त्यांचे योगदान मोठे होते. महात्मा फुले यांच्या जीवनावरील डॉ. कोतापल्ले यांचा ‘ज्योतीपर्व’ हा ग्रंथ सामाजिक आणि परिवर्तनवादी विचारांची साक्ष देतो. कुलगुरु असताना ‘कॉपीमुक्त विद्यापीठ अभियान’ राबविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. राज्य सरकारच्या मराठी राजभाषा धोरण विषयक समितीवर काम करताना त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. प्रा. कोतापल्ले यांच्या निधनाने साहित्य आणि शिक्षणक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. ईश्वर प्रा.नागनाथ कोतापल्ले यांना सद्गती देवो. कोतापल्ले कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी असून हे दु:ख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना मिळो, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

कौतिकराव ठाले पाटील

डॉ. नागनाथ कोत्तापल्ल्यांची व माझी गेल्या ५० वर्षांपासूनची ओळख. ओळखीचे रूपांतर गाढ मैत्रीत झाले. मैत्रीचं रूपांतर पुढे आमच्यातील अभेदात रूपांतरित झालं.कोत्तापल्ले ही मराठवाडा साहित्य परिषदेला लाभलेली मोठी देण होती. मराठवाडा साहित्य परिषदेकडून कशाचीही  अपेक्षा न करता परिषदेवर प्रेम करणारी,परिषदेसाठी वेळ देणारी जी ३-४ माणसं आज दिसतात त्यात कोत्तापल्ले हे एक महत्त्वाचे नाव होते. पुण्यात राहूनही परिषदेची सोपवलेली कामे ते आनंदाने व वेळेत करीत असत. हा शिरस्ता ते दवाखान्यात उपचारासाठी दाखल होईपर्यंत त्यांनी पाळला होता.त्यांच्या निधनाने माझी वैयक्तिक जितकी हानी झालीतितकीच हानी मराठवाडा साहित्य परिषदेचीही झाली आहे.

आ.सतीश चव्हाण

शैक्षणिक क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रात देखील डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय व कौतुकास्पद राहिले आहे. कै.वसंतराव काळे यांच्या माध्यमातून माझी व कोत्तापल्ले सरांची पहिली भेट झाली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कोत्तापल्ले सरांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक व भौतिक विकासात भरीव योगदान दिले. मराठवाड्याचे भुमीपुत्र असलेले कोत्तापल्ले सर ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, वंचित घटकातील विद्यार्थ्यांचे ते आधारवड होते. त्यांच्या जाण्याने शैक्षणिक, साहित्य, संस्कृती, कला आदी क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.