वाचाळवीरांना आवरा-विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार

मंत्री मंगलप्रभात लोढांकडून एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना!

मुंबई ,३० नोव्हेंबर / प्रतिनिधी :- वाचाळवीरांना आवरा असे मी सातत्याने सांगतो आहे. तरी देखील यांच्या मनामध्ये काहीना काही कल्पना अशा येतात ते बोलायला एक जातात आणि त्यातून अर्थ वेगळा निघतो. साधी एक भूमिका देखील या लोकांना कळत नाही. एखाद्याला ठेच लागली की दुसरा ठेच लागू नये म्हणून प्रयत्न करत असतो हे तर यांच्यात दिसतचं नाही. उलट चढाओढ लागलेली दिसते, अशी टीका राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी केली. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अपमनास्पद वक्तव्यावर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

एकाने चूक केली की मग दुसऱ्याला बोलायला संधी मिळाली की, तो चूक करतो, पुन्हा तिसरा चूक करतोय. हे कधी थांबणार आहे? असा संतप्त सवाल अजितदादांनी केला.

एकनाथ शिंदे स्टेजवर असातानाच त्यांच्या देखतच तुलना केली. आपण कोणाशी तुलना करतोय, काय करतोय आपल्याला जबाबादरी काय, आपण कसे बोलले पाहिजे, कसे वागले पाहिजे याचा विचार करावा. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कोणाशी होऊ शकते का? हे महाराष्ट्रात कधी घडलंय का? याचेही तारतम्य या लोकांना राहिले नाही, अशा शब्दांत अजितदादांनी नाराजी व्यक्त केली. निवडणुका लागू दे…जनता यांना योग्य जागा दाखवेल, असेही ते म्हणाले.

मंत्री मंगलप्रभात लोढांकडून एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना!

सातारा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे छत्रपती शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण ताजे असतानाच आणि त्याचे पडसाद राज्यभरात उमटत असतानाच भाजप नेते आणि शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी केली आहे.

“औरंगजेबाने शिवरायांना रोखले, पण छत्रपती शिवाजीराजे हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बादशाहच्या हातावर तुरी देऊन अतिशय चतुराईने तिथून निसटले. शिंदेनाही रोखण्याचे भरपूर प्रयत्न झाले पण शिंदेही महाराष्ट्रासाठी तिकडून (शिवसेना, मविआ) बाहेर पडले”, असे मंगलप्रभात लोढा म्हणाले. त्यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षाने जोरदार आक्षेप नोंदवला असून लोढा यांनी सेना-मविआची तुलना औरंगजेबाशी तर एकनाथ शिंदे यांची तुलना शिवरायांशी केल्याने या प्रकरणावरुन आता नवा वाद होण्याची शक्यता आहे.

आज ३६३ वा शिवप्रताप दिन प्रतापगडावर साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या व्यासपीठावर मंगलप्रभात लोढा यांनी शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी केली. मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस , विद्यार्थी काँग्रेस, युवती काँग्रेस तर्फे जोरदार आंदोलन

भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा सुटकेची तुलना एकनाथ शिंदे यांच्या गद्दारीशी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत एका गद्दाराची तुलना करून संबंध शिवप्रेमी च्या भावना दुखावल्या गेल्या. याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस , विद्यार्थी काँग्रेस, युवती काँग्रेस तर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. संबंध देशाची अस्मिता असलेले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार भाजप नेत्यांकडून अपमान होत आहे. याच्या निषेध म्हणून आज राष्ट्रवादी युवक , युवती , विद्यार्थी काँग्रेस तर्फे “गद्दारीचा किडा, मंगलप्रभात लोढा” अश्या घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गद्दारीचा किडा मंगलप्रभात लोढा… पन्नास खोके एकदम ओके

गद्दारीचा किडा मंगलप्रभात लोढा… पन्नास खोके एकदम ओके… छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणा देत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात त्यांच्याच मलबार हिल विधानसभा मतदारसंघात आज जोरदार आंदोलन करण्यात आले.

भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना एकनाथ शिंदे यांच्या गद्दारीशी केल्याने याच्या निषेधार्ह मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे व कार्याध्यक्ष राखीताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, मुंबई युवती अध्यक्ष अदिती नलावडे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष राज राजापूरकर, प्रदेश संघटक सचिव भालचंद्र शिरोळे, मुंबई उपाध्यक्ष बाप्पा सावंत, मुंबई विद्यार्थी अध्यक्ष प्रशांत दिवटे, दक्षिण मुंबई अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अयुब मेमन आदींसह पक्षाचे इतर पदाधिकारी, वॉर्ड अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.