‘सदाबहार, चतुरस्त्र कलायात्री गमावली:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बेबी तबस्‍सुम यांना श्रद्धांजली

मुंबई ,१९ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-आपल्या सदा हसतमुख आणि प्रसन्न अभिनयाने चित्रपट, दूरचित्रवाणी या क्षेत्रात अमीट छाप सोडणारी चतुरस्त्र कलायात्री गमावली, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेत्री बेबी तबस्‍सुम यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.

भारतीय चित्रपट आणि पुढे दूरचित्रवाणी क्षेत्रात देखील आपल्या चतुरस्त्र कामगिरीने बेबी तबस्‍सुम यांनी एक काळ गाजवला. बालकलाकार ते मार्गदर्शकाच्या भूमिकेतील ज्येष्ठ कलावंत असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. चित्रपटाचा रुपेरी पडदा आणि घराघरातील दूरचित्रवाणीचा पडदा त्यांनी आपल्या प्रसन्नचित्त मुद्रेने व्यापून टाकला. गायन, अभिनय, निवेदन-सूत्रसंचालन, दिग्दर्शन, निर्मिती अशा सर्वच क्षेत्रात त्यांनी आपल्या कामगिरीने अमीट छाप उमटवली. त्यांच्या निधनामुळे एक चतुरस्त्र आणि सदाबहार असे कलायात्रीच आपण गमावली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री बेबा तबस्‍सुम यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रद्धांजली

तबस्सुम यांच्या निधनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका आणि मुलाखतकार आपण गमावली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, बाल कलाकार म्हणून कारकीर्द सुरू केलेल्या तबस्सुम यांनी रसिकांच्या मनात आपले स्वतःचे एक विशिष्ठ स्थान निर्माण केले होते. एक चांगल्या मुलाखतकार म्हणून त्यांनी अनेक नव्या कलाकारांची ओळख करून दिली होती. एक विनोदी लेखिका म्हणूनही त्या सर्वपरिचित होत्या. संपादिका म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम केले. ‘फुल खिले हैं गुलशन गुलशन’ हा 21 वर्षे चाललेला दूरदर्शनवरील कार्यक्रम कोणीही विसरू शकणार नाही. त्यांच्या निधनाने एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांच्या निधनाने इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारी अभिनेत्री गमावली – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शोकसंवेदना

अनेक दशकं हिन्दी सिनेसृष्टी आणि दूरदर्शन वर अधिराज्य गाजविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांच्या निधनाने कला आणि चित्रपट क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे शब्दात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तबस्सुम यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

तबस्सुम म्हणजे हास्य चैतन्य आणि सुगंध. अगदी नावाप्रमाणे आयुष्य व्यतीत करुन इतरांना “फूल खिले हैं गुलशन गुलशन” च्या मुलाखतीत खुलविणाऱ्या उत्तम मुलाखतकार होत्या. भारतीय रसिक प्रेक्षक त्यांचा हसरा चेहरा आणि सिने सृष्टीतील योगदान कधीच विसरू शकणार नाही. इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारी अभिनेत्री गमावल्याची दुःख होत असून तबस्सुम यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.