उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; खासदार गजानन कीर्तिकर शिंदे गटात

मुंबई,११ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेनामध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे हा पक्षप्रवेश पार पडला. त्यांच्या पक्षप्रवेशाने शिंदे गटातील खासदारांची संख्या आता १३ वर गेली आहे.

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार गजानन कीर्तिकर यांनी आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत त्यांचे मनापासून स्वागत केले तसेच भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीकरिता त्यांना शुभेच्छा दिल्या.

खासदार कीर्तिकर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. 

एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि काही दिवसात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी खासदार गजानन कीर्तिकरांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले होते. तर, शिवसेना आणि भाजप हीच खरी युती, असे परखड मत त्यांनी मांडले होते. ते उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते शिंदे गटात येणार अशी चर्चा रंगली होती.