‘हर हर महादेव’ चित्रपट वाद प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना अटक

ठाणे ,११ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईनंतर आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधताना अटकेनंतर आपण जामीन घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी ट्विटरवरही माहिती देत सरकारवर निशाणा साधला आहे.

आव्हाड म्हणाले की, हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केले नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही. आज दुपारी साधारण १ वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या, असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटले कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो. मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवले. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल.

जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेवर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीदेखील प्रतिक्रिया देत म्हंटल की, “जितेंद्र आव्हाड यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील चुकीच्या चित्रपटाचा विरोध केला म्हणून अटक झाली असेल तर आम्हाला त्याचा अभिमान आहे.”

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हंटले की, “महाराष्ट्राच्या पोलीस दलावर माझा पूर्ण विश्वास आहे. कोणाचा फोन आला मला माहित नाही, पण वरुन मोठा दबाव आहे, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी देवाच्या स्थानी आहेत. जर छत्रपती शिवाजी महाराजांबाबत काही चुकीचे दाखवले जाते आणि त्याचा विरोध केल्यास अटक केली जाते. या कारणामुळे जितेंद्र आव्हाड यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावले आणि जेलमध्ये टाकलं, याचं मी मनापासून स्वागत करते.”