राज्यातील प्रकल्पांना आशियाई विकास बँकेने सहाय्य करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई,७ नोव्हेंबर /प्रतिनिधी :-सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी समूह विकास प्रकल्पांसोबतच राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प, पर्यावरण स्नेही नवीन महाबळेश्वर प्रकल्प, पर्यटनाला चालना देणारा मुंबई-सिंधुदूर्ग सागरी महामार्ग प्रकल्प तसेच नदीजोड प्रकल्प, नाशिक, ठाणे आणि पुणे मेट्रो प्रकल्पांना आशियाई विकास बँक (एशियन डेव्हलपमेंट बँक) च्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

आशियाई विकास बँकेचे शिष्टमंडळ राज्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील विविध पायाभूत आणि सामाजिक आर्थिक उन्नती साधणाऱ्या प्रकल्पांविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, एशियन डेव्हलपमेंट बँकेचे कार्यकारी संचालक समीरकुमार खरे, चिंताले वाँग, सेर्जिवो लुगॅरेसी, ताकीओ कोनाशी यांच्यासह राज्य प्रशासनातील विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.

जनतेच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासाचे ध्येय घेऊन राज्य शासन वेगवान निर्णय घेत आहे. सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून कृषी, आरोग्य, शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे. राज्यातील जनतेच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी आमचे प्रयत्न असून पायाभूत प्रकल्पांना एशियन डेव्हपलमेंट बँकेने आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

ठाणे मेट्रोरिंगरोडपुणे आणि नाशिक मेट्रोसाठी मदत करावी

नवीन महाबळेश्वर प्रकल्प पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण करतानाच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीसाठी सहाय्यभूत ठरणार असून बँकेने समूह विकास प्रकल्पांना आर्थिक मदत करावी. जेणेकरून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणे शक्य होईल. एडीबी बँकेने मुंबईतील मेट्रोच्या काही प्रकल्पांना सहाय्य केले असून आता त्यांनी ठाणे मेट्रो, ठाणे रिंगरोड, पुणे आणि नाशिक मेट्रोसाठी देखील मदत करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्य परिवहन मंडळासाठी ५१५० इलेक्ट्रीकल बसेस

यावेळी एडीबी बँकेच्या शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केले. नदी जोड प्रकल्प, वाया जाणारे पाणी दुष्काळी भागात वळविण्यासाठीचा प्रकल्प तसेच राज्य परिवहन मंडळासाठी ५१५० इलेक्ट्रीकल बसेस, त्याचबरोबर ५ हजार डिझेल बसेसचे सीएनजीवर रुपांतर करणे या प्रकल्पांसाठी सहकार्य करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शिष्टमंडळातील सदस्यांनी राज्यात दौरे करून विविध प्रकल्पांच्या लाभार्थींशी प्रत्यक्ष संवाद साधल्याचे यावेळी सांगितले. राज्यात सुरू असलेल्या कामांविषयी शिष्टमंडळातील सदस्यांनी समाधान व्यक्त केले.

पाणी, नदीजोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे कमी पावसाच्या भागात वळविण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील विकास प्रकल्पांना आशियाई विकास बँकेचे (एशियन डेव्हलपमेंट बँक) मोठे सहकार्य लाभत आहे. तसेच सहकार्य करत राज्यातील प्रस्तावित विकास प्रकल्पांना निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकेच्या संचालक मंडळाला केले.

एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या (एडीबी) कार्यकारी संचालक मंडळाच्या शिष्टमंडळाने आज सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत एडीबीच्या प्रतिनिधी मंडळासह राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास, संबंधित विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, ‘देशाच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा सुमारे 50 टक्के आहे. राज्य शासनामार्फत सामाजिक आणि आर्थिक विकासाचे विविध प्रकल्प राबविण्यात येत असून ग्रामीण भागात विकासाचे आणखी प्रकल्प राबविण्याची आवश्यकता आहे. वातावरणीय बदल आणि अनिश्चित पाऊस यामुळे कृषी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर बाधित होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानावर परिणाम होत आहे. कृषी क्षेत्रात शाश्वतता आणण्यासाठी ज्या भागात अधिक पाऊस पडतो त्या भागातील पाणी, नदीजोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे कमी पावसाच्या भागात वळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे कृषी क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कॉप 26 परिषदेत केलेल्या आवाहनानुसार राज्य शासन प्रदूषण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करीत असल्याचे, उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले. याचाच एक भाग म्हणून परिवहन विभागांतर्गत पारंपरिक इंधनावर चालत असलेल्या बसेस ग्रीन आणि स्वच्छ इंधनावर परिवर्तित केल्या जाणार आहेत. एडीबीच्या सहकार्याने शासनाचे मेट्रो प्रकल्प देखील सुरू आहेत. या दोन्ही प्रकल्पांमध्ये यापुढे देखील एडीबीचे सहकार्य अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.

ऊर्जा क्षेत्रात राज्य महत्त्वपूर्ण योजना राबवित असून शेतकऱ्यांना पूर्णवेळ वीज मिळावी यासाठी सौर उर्जेवर फिडर चालविण्यात येणार आहेत. यामुळे वीज उपलब्ध होण्याबरोबरच पर्यावरण रक्षणाला देखील लाभ होईल, असे सांगून राज्याचे महत्वाकांक्षी प्रकल्प तातडीने मार्गी लागावेत यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील वॉर रूम मध्ये निर्णय घेतले जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी एडीबीच्या प्रतिनिधींना दिली. राज्याच्या विकासाचे आणि पर्यावरणपूरक असे हे सर्व प्रकल्प दर्जेदारपणे आणि वेळेत पूर्ण केले जातील, असे सांगून राज्याच्या प्रस्तावित प्रकल्पांना एडीबीने निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी जलसंपदा, परिवहन, ऊर्जा विभागांमार्फत प्रस्तावित महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबाबत सादरीकरण करण्यात आले.