प्रधानमंत्री आवास योजना गतिने राबवावी – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे

औरंगाबाद,७ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि ग्रामीण भागात गतिने राबविण्याची गरज असून सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसात कामाच्या दृष्टीने सकारात्मक पाऊले उचलावीत अशा सूचना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आज येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री  रावसाहेब पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री आवास योजना आणि स्मार्ट सिटी संदर्भात आढाव बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय, महानगर पालिकेचे आयुक डॉ.अभिजीत चौधरी, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, महापालिकेच्या उपायुक्त अर्पणा गिते यांच्यासह सर्व नगरपंचायत, नगरपालिकांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची उपस्थितीत होती.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागातील घरकुल बांधकाम कामाच्या आढाव्या संदर्भात नाराजी व्यक्त्‍ करत श्री.दानवे म्हणाले की, शहर आणि ग्रामीण भागातील अल्प उत्पन्न असणाऱ्या नागरिकांकरीता ही योजना अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि अशी महत्वपूर्ण योजना केवळ तांत्रिक अडचणींमुळे अपूर्ण राहता कामा नये. या करीता सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सकारात्मकदृष्ट्या नागरिकांच्या गरजा ओळखून लाभार्थी मिळविण्याकरीता मेळाव्यांचे आयोजन करावे. जेणे करुन प्रधानमंत्री आवास योजनेची जागृती सामान्य नागरिकांमध्ये होईल. या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरीता प्रकल्पनिहाय मार्ग काढून जास्तीत जास्त घरकुल पूर्णत्वास नेऊन गरीब जनतेला हक्काचे घर मिळवून द्यावे. ज्याठिकाणी प्राथमिक स्तरावर अतिक्रमणाची अडचण असेल तो भाग तात्पुरता वगळून उर्वरित ठिकाणी घरकुलाची कामे पूर्ण करण्याच्या सूचना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांनी दिल्या.

स्मार्ट सिटी संदर्भात मोठ्या प्रमाणात यंत्रणा उभी करण्याकरिता होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न वाढविण्यावर भर द्यावा. स्मार्ट बसच्या फेऱ्या या विमानतळ, रेल्वेस्टेशन आदी भागात प्राधान्याने वाढवाव्यात. त्याचबरोबर अजिंठा, वेरुळ अशा पर्यटनास्थळांवर पर्यटकांनी केवळ एक दिवसीय भेट न ठेवता पर्यटक येथे कसे थांबतील यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना देत श्री. दानवे यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट बस, सफारी पार्क, शिवसृष्टी, पॅन सिटी, एनर्जी ॲण्ड इन्हवायरमेंट सोल्युशन, स्मार्ट सोल्युशन ॲण्ड आयसीटी टेक्नॉलॉजी, सोशल ॲसपॅक्ट, स्मार्ट सिटी मिशन, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलीसी आदी विविध विषयाचा सविस्तर  आढावा घेतला.