कृषी वीजबिल सवलतीचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त व्हा-सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले यांचे आवाहन

औरंगाबाद ,१२ मार्च / प्रतिनिधी :-  महावितरणतर्फे देण्यात येणाऱ्या भरघोस सवलतीचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी कृषिपंपांचे संपूर्ण वीजबिल भरून थकबाकीमुक्त व्हावे आणि स्थानिक विद्युत यंत्रणेच्या विकासाला हातभार लावावा, असे आवाहन महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले यांनी केले.   

Displaying IMG-20220312-WA0123.jpg
रहाटगाव येथे कृषिपंप ग्राहक मेळाव्यात बोलताना सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले. सोबत मुख्य अभियंता भुजंग खंदारे, अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली व इतर अधिकारी.

पैठण तालुक्यातील रहाटगाव येथील हनुमान मंदिरात शनिवारी (१२ मार्च) झालेल्या कृषिपंप ग्राहक मेळाव्यात ते बोलत होते. कृषिपंप वीजजोडणी धोरणानुसार वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी शेतकऱ्यांना जवळपास ६६ टक्के सवलत दिली जात आहे. कृषी वीजबिलाच्या सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम व पूर्ण चालू वीजबिल येत्या ३१ मार्चपर्यंत भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकीची रक्कमदेखील माफ करण्यात येत आहे. त्याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. एकमेकांच्या सहाय्याने आपल्याला पुढे जायचे आहे. सर्वांनी वीजबिल भरल्यास शेतकऱ्यांच्या सर्व विद्युत समस्यांचे निराकरण होणार आहे, असे डॉ.गोंदावले म्हणाले.    

यावेळी औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे म्हणाले की, महावितरणची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. सुरळीत वीजसेवेसाठी बिल  भरल्याशिवाय तरणोपाय नसल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांनी प्रास्ताविकात कृषी वीजबिल सवलत योजना समजून सांगितली. उपस्थित ग्राहकांच्या शंकांचे समाधान केले. कृषी धोरणाचा लाभ अंतिमतः शेतकऱ्यांना होणार आहे, समस्या मार्गी लागणार आहेत. त्यामुळे योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.    

दरम्यान, ज्या शेतकऱ्यांची वीजबिलांबाबत तक्रार किंवा शंका असेल त्याचे तातडीने निराकरण करण्यासाठी जिल्ह्यात विविध गावांत शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. दुरुस्तीनंतरची सुधारित थकबाकीची रक्कम ग्राहकाला तात्काळ कळविण्यात येत आहे. त्याचा लाभ घेऊन बिल भरण्याचे आवाहन करण्यात आले.    

कृषी वीजबिलांच्या चालू व थकीत बिलांच्या भरण्यामधील ६६ टक्के रकमेचा कृषी आकस्मिक निधी हा ग्रामपंचायत (३३ टक्के) आणि जिल्हा स्तरावर (३३ टक्के) कृषी वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या, योग्य दाबाने व सुरळीत वीजपुरवठ्यासह स्थानिक वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाला वेग मिळाला आहे.    

दरम्यान, रहाटगाव येथे ४६९ कृषिपंप ग्राहक असून त्यांच्याकडे जवळपास अडीच कोटी रुपयांची थकबाकी आहे. मात्र आतापर्यंत केवळ ४ लाख रुपये वसूल झाले आहेत. मेळाव्यास शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत वीजबिल भरण्याची तयारी दर्शवली आहे. यावेळी कार्यकारी अभियंता विष्णू ढाकणे, उपकार्यकारी अभियंता कल्याण रंधे, सहायक अभियंता शंकरवार, ज्येष्ठ नागरिक आप्पासाहेब पाटील शिंदे, माजी सरपंच कैलास फासाटे, सरपंच अशोक फासाटे, ग्रा.पं. सदस्य अशोक शिंदे, पोलिस पाटील राम पाटील रंधे, नंदू फासाटे, विठ्ठल फासाटे, शिवाजी शिंदे, लक्ष्मण इरतकर, निलेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.