राज्यातली पोलिस भरती पुढे ढकलली

४८ तासांत मेगा पोलीस भरती प्रक्रियेला स्थगिती; लाखो युवकांना मोठा धक्का

मुंबई,२​९​ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-राज्य शासनाने २७ ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या मेगा पोलीस भरती प्रक्रियेला अचानक स्थगिती दिली आहे. कोविड महामारीनंतर बहुप्रतिक्षीत पोलीस भरती प्रक्रिया ३ नोव्हेंबरपासून करण्याचे आदेश होते. त्याबाबतचे परिपत्रक पोलीस महासंचालकांनी प्रसिद्ध केले होते. मात्र १४ हजार ९५६ जागांसाठी होणारी भरती प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात आली आहे. ४८ तासात राज्य शासनाने निर्णय फिरविल्याने भरतीची तयारी करणाऱ्या लाखो युवकांत नाराजीची लाट पसरली आहे.

फॉर्म भरण्याची प्रक्रिया ३ नोव्हेंबरपासून ३० नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच साधरणत: २७ दिवसांचे नियोजन होते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासुन भरतीची तयारी करणाऱ्या युवा वर्गात मोठ्या मोठ्या उत्साहाचे वातावरण होते. ऐन दिवाळीत राज्य शासनाने मेगा भरती जाहीर करुन युवा वर्गाची दिवाळी गोड केली होती. मात्र,आजच्या निर्णयाने भरतीची तयारी करणाऱ्या युवकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. सर्वांची दिवाळीच कडू झाली आहे.

२७ ऑक्टोंबर रोजी पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी १४ हजार १५६ पदे भरण्याबाबत परिपत्रक जाहिर केले होते. त्यानंतर अवघ्या ४८ तासात या भरतीला प्रशासकीय स्थगिती देण्यात येत आहे. जहिरात देण्याबाबतचा निर्णय यथावकाश कळविण्यात येणार असल्याचे पोलीस महासंचालक संजय कुमार यांनीच २९ ऑक्टोबरच्या परिपत्रकाद्वारे जाहिर केले आहे. बारामतीतील सह्याद्री करीअर अकॅडमीचे संचालक उमेश रूपनवर यांनी सांगितले की, २०१९ पासून कोरोनासह विविध कारणाने लांबलेली भरती प्रक्रिया शासनाने सर्वात मोठी भरती प्रक्रिया सुरू केल्यामुळे उमेदवारांमध्ये उत्साहचे वातावरण होते. मात्र, आजच्या स्थगितीच्या निर्णयाने भरतीची तयारी करणारे उमेदवारच नव्हे तर त्यांच्या पालकांना देखील धक्का बसला आहे.

भरती स्थगितीचे योग्य कारण देणे अपेक्षित असताना केवळ प्रशासकीय कारण दिले आहे. जाहीर केलेली भरती ४८ तासात रद्द करुन शासनाने एक प्रकारे चेष्टाच केल्याची सर्वांची भावना आहे. १२ लाखांपेक्षा जास्त मुले या भरतीची तयारी करीत आहेत. या सर्वांच्या भवितव्याबाबत अनिश्चितता वाढली आहे.