केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी 2 लाख कोटींहून अधिक किमतीच्या सुमारे 225 प्रकल्पांना दिली मंजुरी

महाराष्ट्रातील प्रकल्प आणि रोजगारांविषयी पंतप्रधान मोदी यांची मोठी घोषणा

महाराष्ट्र सरकार युवकांना रोजगार देण्याच्या दृढ संकल्पाने वाटचाल करत आहे

नोकऱ्यांचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे आणि सरकार देखील विविध प्रकारच्या नोकऱ्यांसाठी सतत संधी निर्माण करत आहे

दलित-मागास, आदिवासी, सामान्य वर्ग आणि महिला या सर्वांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी समान प्रमाणात उपलब्ध होत आहेत

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील तीन मोठे प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. हे प्रकल्प महाराष्ट्रात होणार हे जवळपास निश्चित होते, सकारात्मक बोलणी सुरु होती. मात्र, ऐनवेळी हे प्रकल्प केंद्र सरकारच्या दबावामुळे गुजरातमध्ये गेले, असा गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी महत्त्वपूर्ण भाष्य केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्र सरकारच्या रोजगार मेळाव्याला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. पंतप्रधानांनी, धनत्रयोदशीच्या दिवशी केंद्रीय स्तरावर रोजगार मेळाव्याच्या संकल्पनेचा शुभारंभ केला. केंद्र सरकारच्या पातळीवर 10 लाख नोकऱ्या देण्याच्या मोहिमेची ही सुरुवात होती. तेव्हापासून पंतप्रधानांनी गुजरात आणि जम्मू-काश्मीर सरकारच्या रोजगार मेळाव्यांना संबोधित केले आहे. इतक्या कमी कालवाधीत झालेले रोजगार मेळाव्याचे आयोजन पाहता “महाराष्ट्र सरकार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृढ संकल्पाने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या काळात महाराष्ट्रात अशा रोजगार मेळाव्यांचा अधिक विस्तार होईल याचा मला आनंद आहे”. महाराष्ट्राचा गृह विभाग आणि राज्याच्या ग्रामीण विकास विभागात हजारो नियुक्त्या होणार आहेत असे मोदी म्हणाले.

अमृत काळामध्ये देश, तरुणांची भूमिका महत्त्वाची असेल अशा विकसित भारताच्या ध्येयावर काम करत आहे याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. “बदलत्या काळात नोकऱ्यांचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे, सरकारही विविध प्रकारच्या नोकऱ्यांसाठी सतत संधी निर्माण करत आहे.”  मुद्रा योजना तरुणांना तारणमुक्त कर्ज देत आहे आणि 20 लाख कोटी रुपयांचे कर्ज यापूर्वीच वितरित केले गेले आहे. त्याचप्रमाणे, स्टार्ट-अप आणि एमएसएमई क्षेत्राला मोठ्या प्रमाणात पाठबळ दिले जात आहे. महाराष्ट्रातील तरुणांना याचा फायदा झाला आहे, असेही ते म्हणाले.

“सरकारच्या प्रयत्नांबाबतची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या या संधी दलित-मागास, आदिवासी, सामान्य वर्ग आणि महिला सर्वांना समान प्रमाणात उपलब्ध होत आहेत यावर त्यांनी भर दिला.”  बचत गटांशी जोडलेल्या 8 कोटी महिलांना मिळालेल्या 5 लाख कोटी रुपयांच्या मदतीचा पंतप्रधानांनी उल्लेख केला.

“देशभरात आज पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रात सरकार करत असलेली विक्रमी गुंतवणूक रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत आहे.”  महाराष्ट्राच्या संदर्भात पंतप्रधानांनी माहिती दिली की केंद्र सरकारने राज्यासाठी 2 लाख कोटींहून अधिक मूल्याच्या सुमारे 225 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.  75 हजार कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प आणि आधुनिक रस्त्यांच्या 50 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.  “या प्रकल्पांचे काम सुरू आहे किंवा लवकरच काम सुरू होणार आहे”, असे ते म्हणाले. “सरकार पायाभूत सुविधांवर एवढा मोठा खर्च करते, तेव्हा रोजगाराच्या लाखो नवीन संधी निर्माण होतात” अशा शब्दात त्यांनी समारोप केला.”