जांब समर्थ मूर्ती चोर दोन महिन्यांनी सापडले!

जालना : जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथील ऐतिहासिक राम, लक्ष्मण, सीता मूर्ती चोरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने कर्नाटक राज्यातून ताब्यात घेतले आहे.

जांब समर्थ गावातील रामदास स्वामी यांच्या पूर्वजांनी पंच धातूच्या शेकडो वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक श्रीराम, लक्ष्मण, सीता अशा एकूण नऊ मूर्ती दोन महिन्यांपूर्वी चोरी गेल्या होत्या. ही चोरी उघड करण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले होते. हा तपास एसआयटीकडे सोपविण्यात आला होता. शिवाय तामिळनाडू सीआयडीची या तपास कमी मदत घेण्यात आली होती.

मात्र पोलिसांना या प्रकरणात काहीच धागेदोरे हाती लागत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी या चोरी प्रकरणी माहिती देणाऱ्याला दोन लाखांचे बक्षीस ही जाहीर केले होते. अखेर दोन महिन्याच्या कालावधीनंतर या मूर्ती चोरी प्रकरणाचा उलगडा करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले.

या मूर्ती चोरी प्रकरणातील दोन संशयितांसंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेला पक्की खबर मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी कर्नाटक राज्यातून या मुर्ती चोरी प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान या चोरट्यांची नावे अद्याप पोलिसांनी जाहीर केलेले नाही.