आता वैद्यकीय शिक्षण मराठीतून देणार-वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन

मुंबई,​२८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-​ वैद्यकीय अभ्यासक्रम हिंदीतून उपलब्ध करून देण्याचा मध्य प्रदेश सरकारचा निर्णय ताजा असतानाच आता महाराष्ट्रातही मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेत वैद्यकीय शिक्षण घेणे सोपे होणार आहे. २०२३ या शैक्षणिक वर्षापासून ही सुविधा उपलब्ध असेल.

यामुळे आता ‘एमबीबीएस’सह आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी यांसारखे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मराठीतून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. २०२३ च्या शैक्षणिक वर्षांपासून हे अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध होतील. विशेष म्हणजे मराठीतून वैद्यकीयचे शिक्षण घेणे बंधनकारक राहणार नाही, ते ऐच्छिक असेल, असे ते म्हणाले.

मध्य प्रदेशनंतर आता महाराष्ट्रात राज्य भाषेत म्हणजेच मराठी भाषेत वैद्यकीय शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असून सर्वच पॅथी, एमबीबीएस पर्यंतचा अभ्यासक्रम हा मराठीत देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे महाजन यांनी यावेळी सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा इंग्रजीबाबतचा न्यूनगंड दूर करावा यासाठी हा निर्णय घेतला. याबाबत समित्या नेमल्या असून पुढील शैक्षणिक वर्षांपासून हा निर्णय लागू करण्याचा प्रयत्न आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, असेही महाजन म्हणाले.

भोपाळमध्ये वैद्यकीय शिक्षणाच्या हिंदी अभ्यासक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. अलिकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते वैद्यकीय शिक्षण हिंदीतून देण्यासाठी मध्य प्रदेश सरकारची महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. हिंदी अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकाचे अनावरण शाह यांच्या हस्ते पार पडले.