शून्यातून व्यक्तिमत्व कसे उभे राहते याचा आदर्श उदाहरण म्हणजे भुजबळ आहेत- शरद पवार यांचे ​ कौतुकोद्गार

छगन भुजबळ यांच्या​ ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘अमृत महोत्सव’ सोहळा

मुंबई,१३ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आज पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘अमृत महोत्सव’ सोहळा झाला. या कार्यक्रमात भुजबळ यांच्या जीवनावरील ‘बहुजननायक छगन भुजबळ’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी उत्सवमूर्ती छगन भुजबळ व मीना छगन भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला.

या सोहळ्याला माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, जम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला, ज्येष्ठ लेखक-कवी डॉ. जावेद अख्तर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनील तटकरे, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार राजेश टोपे, आमदार सचिन अहिर, आमदार कपिल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी तसेच छगन भुजबळ यांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या आयुष्यातील राजकीय संघर्षाचा आलेख मांडला. गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विकासाच्या कामाला प्रोत्साहन देणारा नेता म्हणून आपण त्यांना ओळखतो. शून्यातून व्यक्तिमत्व कसे उभे राहते याचा आदर्श उदाहरण म्हणजे भुजबळ आहेत, असे कौतुकोद्गार पवार यांनी काढले. छगन भुजबळ यांनी केलेल्या उत्तम कामाची ओळख पटवून देताना पवार यांनी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाची आठवण करून दिली. दिल्लीच्या सौंदर्यामध्ये भर टाकेल अशी ती वास्तू बांधण्यात आली आहे. त्याशिवाय नाशिक जिल्ह्याचा चेहरा बदलण्यामध्ये भुजबळांचे योगदान प्रचंड आहे याची नोंद कायम राहील, असे ते म्हणाले.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनीही भुजबळ यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अजितदादा म्हणाले की, आम्ही राजकीय जीवनात कामाला सुरुवात केली तेव्हा ज्येष्ठ नेते म्हणून भुजबळ यांच्या हाताखाली काम करण्याची संधी आम्हाला मिळाली. एखाद्या गोष्टीत जीव ओतून त्यामध्ये काम करण्याची त्यांची भूमिका असते. त्यांना दिलेली जबाबदारी पार पाडताना आपल्या कार्याचा अमीट ठसा उमटविला आहे, अशा शब्दांत अजितदादांनी छगन भुजबळ यांचे कौतुक केले.

या कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण पक्षाचे खासदार प्रफुल पटेल यांनी केले. भुजबळ यांची एकसष्टी साजरी केली तेव्हा देखील लाखोंच्या संख्येने त्यांच्यावर प्रेम करणे मान्यवर आले होते. आज महाराष्ट्रातील दलित, शोषितांसाठी लढा देणारा एक योद्धा म्हणून भुजबळ यांची ओळख महाराष्ट्रात आणि देशात आहे, असे प्रफुल पटेल म्हणाले. १९८५ मध्ये शिवसेनेचे पहिले आमदार तसेच त्याच वर्षी महापौर पद जिंकून त्यांनी आपल्या राजकीय कार्याचा ठसा उमटवला. त्यांचा हा प्रवास आज आपण पाहत आहोत. तसेच भुजबळ यांच्या शंभरीलादेखील आपण इतक्याच मोठ्या संख्येने निश्चित उपस्थित राहू, असा विश्वास प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला.

भुजबळांनी भ्रष्टाचारांच्या आरोपांवर दिले उत्तर

या कार्यक्रमाला आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही बोलावलं होतं, पण ते आले नाहीत, अशी खंत छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात भुजबळांनी त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांवरही उत्तर दिलं.

लोक म्हणतात एवढी संपत्ती कशी, पण आम्ही दोन भावांनी खूप मेहनत घेतली. सकाळी 3 वाजता भाजी घ्यायला मार्केटमध्ये जायचो. ती भाजी माझगावच्या घरासमोरच्या फुटपाथवर विकायची. नंतर मोठ्या कंपन्यांची कॉन्ट्रॅक्ट घेतली आणि ट्रकभर भाजी पाठवायचो. लोक एवढी संपत्ती कुठून आली विचारतात, पण आम्ही लहानपणापासून मेहनत घेतली, असं भुजबळ म्हणाले.

‘माथाड्यांची कॉन्ट्रॅक्ट घेतली त्यात दोन पैसे मिळाले. एक कंपनी बंद पडली होती, तेव्हा कामगारांनी मलाच कंपनी चालवा आणि पगार द्या असं सांगितलं. अख्ख्या बीएसटीचे टायर माझ्याकडे रिमोल्डिंगला यायचे. रबरची दुसरी कंपनी पनवेलला घेतली. मुंबई-गोवा पहिली लक्झरी बस भवानी ट्रॅव्हल्स छगन भुजबळने सुरू केली. सिनेमे काढले, अनेक उद्योग सुरू होते,’ असं भुजबळांनी सांगितलं.’माझं नाव तेलगी स्टॅम्प केसमध्ये घेतलं गेलं. मोका लावला, क्लीन चिट दिली, पण जे नुकसान व्हायचं ते झालं. उपमुख्यमंत्रीपद गेलं, मंत्रिपदही गेलं. साहेब म्हणाले निवडणूक लढणार का? हो म्हटलो,’ असा किस्सा भुजबळांनी सांगितला.

‘बोट क्लब केला होता, अमेरिकेतून 50 बोटी आणल्या होत्या, पण सरकार गेलं त्यातल्या 10-12 बोटी गायब झाल्या. कॉन्ट्रॅक्ट 100 कोटींचं यांनी आरोप केला 25 हजार कोटी खाल्ले. म्हैस केवढी तिला एवढं मोठं रेडकू होणार का?,’ असा सवाल भुजबळांनी विचारला.

महाराष्ट्र सदन किती सुंदर, महाराष्ट्र सदन सुंदर है… बनानेवाला अंदर है… अशी गत होती. अडीच वर्ष आत राहिलेल्या माणसाला शरद पवार साहेबांनी शिवाजी पार्कात उभं केलं आणि मंत्रीपदाची शपथ दिली, एवढं कोण करतं. मला बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यासारखे नेते लाभले. माझ्या इतका भाग्यवान कोणताच राजकारणी नाही. अडचणीत लोकांना साथ कशी द्यायची, हे मी यांच्याकडून शिकलो, असं वक्तव्य भुजबळांनी केलं.

भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर ते त्याआधीच मुख्यमंत्री झाले असते-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महत्त्वाचं विधान केलं. छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर ते वेळेआधीच मुख्यमंत्री झाले असते, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं. यावेळी ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून म्हणाले. “अजित दादा तुम्ही बोलताय की, चार महिने तुम्हाला मिळाले असते तर भुजबळ मुख्यमंत्री झाले असते. मी थोडं करेक्शन करतो, भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर ते त्याआधीच मुख्यमंत्री झाले असते. आणि सरकार वाचवण्यामध्ये ते किती वाकबदार आहेत ते तुम्ही मला आता सांगत आहात, खरंतर तुम्ही मला तेव्हा सांगायला हवं होतं. मी पण त्यांना कामाला लावून दिलं असतं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच “भुजबळ परत आले तर सोबत संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस आणि सोबत काँग्रेसलाही घेऊन आले”, असंदेखील ठाकरे यावेळी म्हणाले.

“एक गोष्ट नक्की, आता आम्ही धक्काप्रुफ झालो आहोत. असं म्हणतात की जपानला एखाद दिवळी भूकंप नाही झाला तर लोकं परेशान होतात की, आज काय भाई, पण पहिला आणि मोठा मानसिक धक्का आम्हा कटुंबियांना बसला तेव्हा भुजबळ तुम्ही शिवसेना सोडल्यानंतर. माँ, बाळासाहेब यांना धक्का बसला होता. आपल्या कुटुंबातील माणूस आपल्याला सोडून जाऊ कसा शकतो? हाच मोठा धक्का होता. राग वगैरे तो राजकारणाचा वेगळा भाग होता. पण आपला माणूस हा जाऊ शकतो हा एक मोठा धक्का होता. त्यातून मानसिकरित्या सावरायला आम्हाला थोडा वेळ लागला”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भावना व्यक्त केल्या.