कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा सोहळा दिमाखात साजरा

  • मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती
  • सजवलेले उंट, घोडे, चित्ररथ, शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके, शाही लवाजम्यातील मिरवणुकीने वेधून घेतले नागरिकांचे लक्ष

कोल्हापूर, ५ऑक्टोबर /प्रतिनिधी :- छत्रपतींची राजधानी असणाऱ्या करवीर नगरीत पारंपरिक विजयादशमीचा सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात दिमाखात साजरा झाला. श्री शाहू महाराज छत्रपती व संभाजीराजे छत्रपती यांच्या सहकार्याने, दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव यावर्षी भव्य स्वरुपात अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला.

दसरा सोहळ्यामध्ये श्री शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते शमीपूजन झाले. यानंतर छत्रपतींच्या कुटुंबातील युवराज संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती व यशस्विनीराजे छत्रपती यांनी सोने लुटताच करवीरवासियांनी अपूर्व उत्साहात सीमोल्लंघन करुन सोने लुटले.

तत्पूर्वी करवीर निवासिनी अंबाबाई(श्री महालक्ष्मी), जुन्या राजवाड्यातील तुळजाभवानी आणि गुरु महाराज यांच्या पालख्यांचे लवाजम्यासह आगमन झाले. यानंतर श्रीशाहू महाराज छत्रपती व कुंटुंबातील सदस्यांचे परंपरागत पध्दतीने ऐतिहासिक मेबॅक मोटारीतून दसरा चौकात आगमन झाले. यावेळी पोलीस विभाग व टी.ए. बटालियनच्या बँड पथकाने करवीर संस्थानचे गीत वाजवून त्यांचे स्वागत केले. दसरा महोत्सव समितीच्यावतीने शाही कुटुंबातील सदस्यांचे स्वागत करण्यात आले. शाही घराण्याच्या प्रथेप्रमाणे औक्षण करण्यात आले. पारंपरिक पध्दतीने पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधीवत पूजा केल्यानंतर देवीची आरती करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांनी उत्साहात सोने लुटले. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्यासह राजघराण्यातील सदस्यांना नागरिकांनी त्यांना सोने दिले.

या सोहळयास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील, माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ, आमदार जयंत आसगावकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार जयश्री जाधव, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ.डी. वाय. पाटील, दैनिक पुढारीचे संपादक पद्मश्री डॉ.प्रतापसिंह जाधव, दैनिक सकाळ चे समूह संपादक श्रीराम पवार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. मनोज लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी.टी.शिर्के, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, डॉ. संजय डी.पाटील, दसरा महोत्सव समितीचे विक्रमसिंह यादव, दिग्विजयराजे भोसले, बाबा चव्हाण, माणिक मंडलिक, राजेंद्र दळवी, ऍड.राजेंद्र चव्हाण, प्रसन्न मोहिते आदींसह विविध विभागांचे मान्यवर, जहागीरदार, सरदार, सरकार घराण्यातील मान्यवर, पदाधिकारी, पोलीस व विविध विभागांचे अधिकारी, आणि निमंत्रित उपस्थित होते.

भव्य मिरवणुकीने वेधून घेतले लक्ष- सजवलेले उंट, मावळ्यांच्या वेशभूषेतील घोडेस्वार, शिवकालीन युद्धकलांची व मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, इतिहासाच्या स्मृती जागवणारे पोवाडे, पारंपरिक पद्धतीने निघालेल्या देवीच्या पालख्या अशा शाही लवाजम्यात निघालेल्या मिरवणुकीने उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत सामाजिक संदेश देणारे चित्ररथ तसेच तालमींचे कुस्तीगीर सहभागी झाले होते. तर रस्त्याच्या दुतर्फा एनसीसीचे विद्यार्थी उभे होते. या सर्व कार्यक्रमांचे नियोजन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली दसरा नियोजन समिती सदस्य उदय गायकवाड, प्रमोद पाटील, प्राचार्य महादेव नरके, अजेय दळवी, आदित्य बेडेकर , ऋषिकेश केसकर, सुखदेव गिरी यांनी केले.

शाही दसरा फेस्टिवल स्ट्रीटला भरघोस प्रतिसाद

जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शाही दसरा फेस्टीवल स्ट्रीट’ला नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला.
महावीर कॉलेज ते स्टार बझार, खानविलकर पेट्रोलपंप या रस्त्याच्या दोन्ही बाजूस बचत गटाचे 110 स्टॉल्स उभे करण्यात आले होते. या शाही दसरा फेस्टिवल स्ट्रीटमध्ये बचत गटाच्या माध्यमातून विविध कलावस्तुंचे व खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. ग्रामीण व शहरी बचत गटांच्या स्टॉलवर वस्तू खरेदी व पदार्थ खाण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली.

नागरिकांना शाही दसरा महोत्सव सोहळा पाहता यावा यासाठी शहरात विविध ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या.