कंगना राणावतला ‘वाय’ दर्जाची सुरक्षा

नवी दिल्ली,
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासोबतच्या शाब्दिक चकमकीमुळे वादाच्या भोवर्‍यात सापडलेली चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत हिला केंद्रीय गृहमंत्रालयाने वाय सुरक्षा प्रदान केली आहे.

कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तिने मुंबईत येऊ नये म्हणून अनेकांनी तिला धमकी वजा इशारे दिले आहेत. या सर्व धमक्यांमुळे कंगनाच्या वडिलांनी हिमाचल प्रदेश सरकारकडे तिच्यासाठी पोलिस संरक्षण मागितले होते. आत मात्र कंगनाला केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कंगना राणावतला ‘Y’ दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर कंगना राणावतने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे जाहीर आभार मानले आहेत.

https://twitter.com/KanganaTeam/status/1302846165637971969

मुंबई ही व्याप्त काश्मीरसारखी झाली आहे काय, असा सवाल कंगना राणावतने केला होता. यावर शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी तीव्र हरकत घेतली होती. कंगना जी भाषा बोलत आहे, ती आम्ही बोलू शकत नाही, ज्या थाळीत जेवायचे, त्यातच ती छिद्र करीत आहे. कंगनाला जर व्याप्त काश्मिरात जायचे असेल तर तिने अवश्य जावे, तिच्या प्रवासाचा खर्च आम्ही उचलू, व्याप्त काश्मिरात जाऊन तिने ते एकदा पाहूनच घ्यावे, असे राऊत यांनी म्हटले होेते.

मुंबई ही मराठी माणसाची बाप आहे, ज्याला ते मान्य नाही, त्याने आपला बाप दाखवून द्यावा, मुंबईच्या दुश्मनाचे श्राद्ध घातल्याशिवाय शिवसेना राहणार नाही, असे सांगत कंगनाला मुंबईत पाय ठेवू देणार नाही, अशी धमकीही राऊत यांनी दिली होती. याला प्रत्युत्तर देताना कंगना राणावतने, मी 9 सप्टेंबरला मुंबईत येत आहे, कोणाची हिंमत असेल तर त्याने मला रोखून दाखवावे, असे आव्हान दिले होते. मुंबई विमानतळावर मी किती वाजता पोहोचणार आहे, त्याची वेळ मी सांगेन, कोणाच्या बापात हिंमत असेल तर त्याने मला रोखून दाखवावे, असे राणावतने म्हटले होते.शिवसेनेसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही कंगना राणावतचा निषेध केला. कंगनाने आपल्या विधानासाठी माफी मागितली नाही, तर मनसेची महिला आघाडी तिला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे मनसेने जाहीर केले होते.
हिमाचल प्रदेशही देणार सुरक्षा
दुसरीकडे कंगनाच्या वडिलांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना पत्र पाठवून आपल्या मुलीला संरक्षण देण्याची मागणी केली होती. त्यानुसार ठाकूर यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना कंगनाला राज्यात सुरक्षा देण्याचे निर्देश दिले होते.
 
मात्र, राज्याबाहेर हिमाचल पोलिस तिला सुरक्षा देऊ शकत नाही. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने कंगनाला वाय सुरक्षा व्यवस्था देण्याचे घोषणा केली. यात दोन व्यक्तिगत सुरक्षा अधिकारी, दोन कमांडो आणि 7 सुरक्षा जवान असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *