काँग्रेसच्या पाच बड्या नेत्यांना ईडीचे समन्स

नवी दिल्ली : एकीकडे काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी हे भारत जोडो यात्रा करत असतानाच, दुसरीकडे काँग्रेसमधील पाच बड्या नेत्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात तेलंगणामधील काँग्रेसच्या पाच नेत्यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून नोटीस देण्यात आली आहे. या पाच नेत्यांना मंगळवारी ईडीच्या दिल्लीतील मुख्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

राहुल आणि सोनिया गांधी हे यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक असताना या नेत्यांनी त्यासाठी देणगी दिली होती. याच प्रकरणाचा तपशील जाणून घेण्यासाठी ईडीने या पाच नेत्यांना समन्स दिले आहे. या पाच नेत्यांमध्ये मोहम्मद अली शब्बीर, गीता रेड्डी, सुदर्शन रेड्डी, अंजन कुमार आणि गली अनिल यांचा समावेश आहे.

यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने काँग्रेसच्या कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना पक्षाच्या मालकीच्या नॅशनल हेरॉल्ड वृ्त्तपत्रातील कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. डी. के. शिवकुमार यांना ७ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. एकीकडे भारत जोडो यात्रेला कर्नाटकात प्रचंड प्रतिसाद मिळत असतानाच कर्नाटकातील नेत्यांना हे समन्स बजावण्यात आले आहे.