मेहनत व बुद्धी यांच्या संगमातून प्रगती साधता येते; आर्थिक उलाढालीतून उत्कर्ष साधता येतो- केंद्रीय मंत्री नारायण राणे

लघु उद्योग भारती तर्फे आज मुंबई येथे ‘प्रदेश अधिवेशन 2022’ चे आयोजन

मुंबई ,१६ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- लघु उद्योग भारती तर्फे आज मुंबई येथे ‘प्रदेश अधिवेशन 2022’ चे आयोजन करण्यात आले  होते. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे या अधिवेशनास उपस्थित होते.

सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांचा वित्तपुरवठा; कृषी उत्पादने व अन्न प्रक्रिया उद्योगातील संधी; निर्यातींच्या संधी; ब्रँडींग व मार्केटिंगचे महत्त्व या विषयांवर या अधिवेशनात चर्चा होणार आहे.अधिवेशनास मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहिल्यानंतर नारायण राणे यांनी आपले विचार यावेळी व्यक्त केले. उद्योजकांमुळे वस्तू निर्मिती, रोजगार निर्मिती, देशाच्या उत्पादनात वाढ अशा सर्व गोष्टी साधल्या जातात. आयात कमी करून ‘आत्मनिर्भर’ होणे व निर्यात करून उत्पन्न कमावणे, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

नोकरी व व्यवसाय करणाऱ्यांच्या जीवनमानातील फरक आपणच तपासून पहावा आणि समृद्ध व्हायचे असल्यास उद्योग करणे केव्हाही श्रेयस्कर आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. उद्योजक स्वतःबरोबर देशाची सुद्धा प्रगती साधत असतात. मेहनत आणि बुद्धी यांच्या संगमातून प्रगती साधता येते. आर्थिक उलाढालीतून उत्कर्ष साधता येतो, असे संगत त्यांनी ‘एमएसएमई’ मंत्रालय अनेक उद्योगांना आर्थिक मदत करते, सवलती देते, अशी माहिती त्यांनी दिली.

आपला अनुभव सांगताना ते म्हणाले की, सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी मी स्वतः  गावागावात अधिकारी पाठवले, पण त्याला प्रतिसाद अल्प मिळाला. महिला, मागासवर्गीय अशा सर्वांसाठी अनेक कुटिरउद्योग एमएसएमई मंत्रालायकडे आहेत. लोकांनी यासाठी पुढे यावे, असे आवाहन नारायण राणे यांनी केले. जीडीपी, आर्थिक महासत्ता हे सर्व कृतीतून करता येईल; महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील उद्योजकांचे उत्पादन जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊ देत, अशी इच्छा यावेळी नारायण राणे यांनी व्यक्त केली. गुणवत्तेलाही खूप महत्त्व दिले पाहिजे त्यावरच वस्तूचे अधिक मूल्य अवलंबून असते, असे सांगून त्यांनी त्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले.