महाराष्ट्र विश्वस्त कायदा सुधारणेबाबत राज्यमंत्री विधी व न्याय यांच्या उपस्थितीत बैठक

मुंबई,२८मे /प्रतिनिधी :-  महाराष्ट्र विश्वस्त कायद्यामध्ये सुधारणा करण्याबाबत विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या दालनामध्ये बैठक झाली.

यावेळी राज्य विधिमंडळात सदस्यांनी उपस्थित केलेल्या सूचना, शासनाला प्राप्त झालेली निवेदने याबाबींच्या अनुषंगाने महाराष्ट्र विश्वस्त कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार कपिल पाटील, विधी व न्याय विभागाचे सचिव डी. एन. गुरव, विधी सल्लागार-नि-सह सचिव नितीन जिवने, धर्मादाय सह आयुक्त श्रीमती पवार आदी अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र विश्वस्त कायद्यातील तरतुदींच्या अनुषंगाने विविध विश्वस्त संस्थांमधील निवडणुका, विश्वस्त संस्थांमध्ये नव्याने करण्यात आलेल्या नियुक्त्या, विश्वस्त आयुक्त यांच्याकडे घ्यावयाच्या नोंदी म्हणजेच चेंज रिपोर्ट स्वीकृत करणे, विश्वस्त संस्थांच्या संबंधित न्यायालयीन बाबींचा निपटारा करणे आदींच्या अनुषंगाने महाराष्ट्र विश्वस्त कायद्यामध्ये काही मूलभूत सुधारणा करण्याबाबत सर्वसमावेशक चर्चा यावेळी करण्यात आली.

राज्यमंत्री तटकरे यांनी महाराष्ट्र विश्वस्त कायद्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश विभागास दिले. विभागाकडून प्राप्त झालेल्या सर्वसमावेशक प्रस्तावावर शासन स्तरावर निर्णय घेऊन व आगामी अधिवेशनामध्ये या बाबतचे विधेयक सादर करणे सुलभ होईल, या अनुषंगाने कार्यवाही करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या.