गोव्यात काँग्रेसचे ८ आमदार भाजपमध्ये

पणजी : देशभरात काँग्रेसकडून भारत जोडो यात्रा सुरू असताना दुसरीकडे गोव्यात मात्र भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. विरोधी पक्षनेते मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांच्यासह आठ आमदार आज भाजपात प्रवेश केल्याची माहिती गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत  आणि भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिली.

Image

गोव्यातील निवडणूक झाल्यापासून काँग्रेसचे आमदार दुसऱ्यांदा भाजपमध्ये जात आहेत. काही महिन्यांपूर्वी गोव्यात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला ११ जागांवर विजय मिळाला होता. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दुसऱ्यांदा काँग्रेसला धक्का दिला आहे. विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी काँग्रेसमध्ये मोठी फूट पाडली होती. काँग्रेसच्या आठ आमदारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. भाजपात सामिल होणाऱ्या आमदारांमध्ये माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचाही समावेश आहे. दिगंबर कामत हे काँग्रेसचे गोव्यातील महत्त्वाचे नेते समजले जातात.

जुलै महिन्यात गोव्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या. जुलै महिन्यातच काँग्रेसचे काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते. भाजप काँग्रेसचे दोन तृतीयांश आमदार फोडत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्यावेळी काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावरून मायकल लोबो यांना हटवण्याची घोषणा केली होती. भाजपकडून मोठ्या प्रमाणावर पैशांची ऑफर दिली असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.

गोवा: काँग्रेसमधील अकरापैकी आठ आमदारांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर पणजी येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये येऊन भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेश भाजपाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सरचिटणीस दामोदर नाईक, ऍड. नरेंद्र सावईकर, उपाध्यक्ष बाबू कवळेकर यांच्यासह काँग्रेस सोडलेले आठ आमदार उपस्थित होते.
 
काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या आमदारांना पुष्पगुच्छ, पक्षाची पावती आणि भाजपचा शेला देऊन रीतसर भाजपमध्ये प्रवेश दिला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “भारत-जोडो यात्रेला गोव्यातून ‘काँग्रेस छोडो’ अभियानाने प्रत्युत्तर देण्यात आले आहे.” निवडून आलेल्या अकरापैकी आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत संबंधित आमदारांवर कारवाई होणार नाही.
 
पक्षांतरबंदी कायद्यानुसार किमान दोन तृतियांश आमदारांनी एकत्रितपणे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला अथवा पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्याने कारवाई करता येत नाही. कायद्यातील या तरतुदीमुळे पक्षांतर करूनही संबंधित आमदारांची आमदारकी सुरक्षित राहणार आहे.
 
मोठ्या प्रमाणात झालेल्या पक्षांतरामुळे गोव्यात काँग्रेसचे अवघे तीन आमदार उरले आहेत. याउलट भाजपच्या आमदारांची संख्या आधी २० होती आत २८ झाली आहे. गोवा विधानसभेतील ४० पैकी २८ आमदार भाजपचे आहेत. या व्यतिरिक्त महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीच्या दोन आमदारांचा आणि तीन अपक्षांचा पाठिंबा गोवा सरकारला आहे. यामुळे गोवा सरकारकडे विधानसभेतील ४० पैकी ३३ आमदारांचे पाठबळ झाले आहे.