शिंदे गटाला मिळाली ‘ढाल-तलवार’

नवी दिल्ली /मुंबई,११ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-  शिवसेनेतील शिंदेगटाला अखेर ‘ढाल-तलवार’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. काल उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘मशाल’ हे चिन्ह मिळाले. त्यानंतर शिंदे गटाला कुठले चिन्ह मिळणार याबाबत जोरदार चर्चा होती.

निवडणूक चिन्हासाठी शिंदे गटाने निवडणूक आयोगाला दोन मेल पाठवले होते. पहिल्या मेलमधून शंख, तुतारी आणि रिक्षा ही तीन चिन्हे तर दुसऱ्या मेलमध्ये ढाल-तलवार, सूर्य, पिंपळाचे झाड हे तीन चिन्ह आयोगासमोर ठेवण्यात आले होते. त्यापैकी ‘ढाल-तलवार’ हे चिन्ह शिंदे गटाला मिळाले आहे.

आमची ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आहे. हा विचार आम्ही पुढे नेत आहोत-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘आमची मराठमोळी निशाणी आहे. ढाल-तलवार बाळासाहेबांच्या शिवसेनेची जुनीच निशाणी आहे. त्यामुळे परफेक्ट काम झाले आहे. ढाल-तलवार छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांची निशाणी आहे. आमची ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आहे. हा विचार आम्ही पुढे नेत आहोत. हजारो लोक आमच्याबरोबर येत आहेत. ठाकरेंची शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच्या गटाला मिळालेल्या पक्षचिन्हानंतर व्यक्त केली.

शिंदे गटाने दिलेले ‘तळपता सूर्य’ हे पहिल्या पसंतीचे चिन्ह आयोगाने नाकारले आहे. मिझोराममधील झोराम नॅशनल पार्टीचे हे चिन्ह असल्याने ते देता येत नाही, असे आयोगाने स्पष्ट केले व शिंदे गटाला ढाल-तलवार हे निवडणूक चिन्ह दिले.