कोविड-19 मृत्यू दर कमी करण्यासंबंधी सर्व प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्याचे केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश

देशातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 14.2 लाखांपेक्षा अधिक


नवी दिल्‍ली, 8 ऑगस्‍ट 2020

केंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारांनी केलेल्या कोविड-19 च्या समन्वित, श्रेणीबद्ध आणि सक्रिय व्यवस्थापनामुळे राष्ट्रीय मृत्यु दर (सीएफआर) कमी होत आहे. सध्या हा दर  2.04% आहे. कोविड-19 च्या एकत्रित व्यवस्थापनासाठी राज्य / केंद्रशासित प्रदेशांच्या नियमित आढावा आणि मार्गदर्शन प्रक्रियेचा भाग म्हणून, 7आणि 8  ऑगस्ट रोजी आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली दोन उच्च स्तरीय आभासी बैठका आयोजित करण्यात आल्या. ज्या राज्यांमध्ये कोविड रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे अशा राज्यांना यात सहभागी करून घेण्यात आले आणि कोविड-19 मुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण रोखण्याच्या आणि कमी करण्याच्या प्रयत्नांबाबत त्यांना सल्ला आणि सूचना देण्यात आल्या.

आजची बैठक आठ राज्ये / केंद्रशासित प्रदेशामधील 13 जिल्ह्यांवर केंद्रित होती. यामध्ये आसाममधील कामरूप मेट्रो; बिहारमधील पाटणा; झारखंडमधील रांची; केरळमधील अलाप्पुझा आणि तिरुवनंतपुरम; ओदिशामधील गंजम; उत्तर प्रदेशमधील लखनऊ; पश्चिम बंगालमधील 24  परगणा उत्तर, हुगळी, हावडा, कोलकाता आणि मालदा; आणि दिल्ली यांचा यात समावेश होता. या जिल्ह्यांमध्ये भारतातील जवळपास 9% सक्रिय रुग्ण आहेत आणि कोविड मृत्यूंपैकी 14% मृत्यू येथे झाले आहेत. तसेच या जिल्ह्यांमध्ये प्रति दशलक्ष चाचण्यांचे प्रमाण कमी असून रुग्ण बाधित आढळण्याचे प्रमाण अधिक आहे. आसाममधील कामरूप मेट्रो; उत्तर प्रदेशमधील लखनऊ; केरळमधील तिरुअनंतपुरम आणि अलप्पुझा या चार  जिल्ह्यांमध्ये दररोज नवे रुग्ण आढळण्यात वाढ दिसून आली आहे. या आभासी बैठकीत जिल्हा देखरेख अधिकारी, जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्यासह आठ राज्यांतील प्रधान सचिव (आरोग्य) आणि संचालक (एनएचएम) सहभागी झाले होते.

बैठकी दरम्यान कोविड मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. आरटी-पीसीआरसाठी दररोज 100 पेक्षा कमी आणि इतरांसाठी 10; प्रति दहा लाख लोकसंख्येमागे कमी प्रमाणात चाचण्या; गेल्या आठवड्यापासून परिपूर्ण चाचण्यांमध्ये घट; चाचणी अहवालांना विलंब आणि आरोग्य सेवा कामगारांमधील संसर्गाचे अधिक प्रमाण यांसारख्या प्रयोगशाळा वापराशी संबंधित समस्यांवर राज्यांना मार्गदर्शन करण्यात आले. काही राज्यांमध्ये रुग्णालयात दाखल केल्याच्या 48 तासाच्या आत मरण पावलेल्या रूग्णांच्या पार्श्वभूमीवर बाधित रुग्णांची वेळेवर नोंद आणि रुग्णालयात दाखल करण्याबाबत सूचना करण्यात आली. तसेच नकार देणाऱ्या शून्य सहिष्णुता असलेल्या रुग्णवाहिकांची अनुपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश राज्यांना देण्यात आले. दैनंदिन आधारावर प्रत्यक्ष भेटी / दूरध्वनीद्वारे सल्लामसलत यावर विशेष भर देऊन लक्षणे न आढळलेल्या रुग्णांचे घरीच अलगीकरण करून त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची आवश्यकता अधोरेखित केली गेली. प्रचलित रुग्णांचे प्रमाण आणि अंदाजित वाढीच्या दराच्या आधारे राज्यांना वेळेत मूल्यांकन करण्याची आणि आयसीयू बेड, ऑक्सिजन पुरवठा इत्यादी पायाभूत सुविधांसाठी आगाऊ तयारी करण्याची सूचना देण्यात आली

नवी दिल्लीतील एम्स, आठवड्यातून दोनदा मंगळवार आणि शुक्रवारी आभासी सत्रांचे आयोजन करते ज्यामध्ये डॉक्टरांचे तज्ञ पथक दूरध्वनी / व्हिडिओच्या माध्यमातून सल्लामसलतीद्वारे वेगवेगळ्या राज्य रुग्णालयांच्या आयसीयूमधील कोविड रूग्णांच्या प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापनाविषयी आणि मृत्युदर कमी करण्याबाबत मार्गदर्शन करते. वैद्यकीय पद्धती सुधारण्यासाठी राज्यातील सर्वोत्कृष्ट केंद्र असलेली रुग्णालये नियमितपणे या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी व्हावीत यासाठी राज्य प्रशासनांना सूचना देण्यात आल्या. वाढते रूग्ण आणि गंभीर रुग्णांकडे विशेष लक्ष देण्यावर भर देताना वैद्यकीय व्यवस्थापनासह प्रतिबंधित आणि बफर झोनच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी मंत्रालयाच्या सर्व नियमांचे पालन करण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला. आणखी एक प्रमुख विषय हा होता की, उच्च-जोखीम असणार्‍या लोकांमध्ये म्हणजे इतर गंभीर आजार, गर्भवती महिला, वृद्ध आणि मुले यांच्यावर काटेकोरपणे देखरेख ठेवण्यामुळे मृत्यू टाळता येतात.

रुग्ण बरे होण्याच्या दरात सातत्याने सुधारणा

केंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारांकडून प्रतिबंध, चाचणी, अलगीकरण आणि उपचारांच्या केंद्रित आणि प्रभावी प्रयत्नांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे आणि मृत्यूच्या दरात सातत्याने  घट होत आहे.

प्रभावी देखरेख आणि सुधारित चाचणी नेटवर्कमुळे बाधित रुग्णांची  लवकर ओळख पटली आणि परिणामी गंभीर आणि अति गंभीर रुग्णांचे वेळेवर नैदानिक ​​व्यवस्थापन होते. जागतिक स्तरावर तुलना केली तर भारतात प्रति दहा लाख लोकसंख्येमध्ये बाधित रुग्णांचे प्रमाण 1469 आहे तर जागतिक सरासरी 2425 इतकी आहे.

केंद्र सरकार आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारच्या “टेस्ट ट्रॅक ट्रीट” रणनीतीची समन्वित अंमलबजावणी केल्यामुळे जागतिक परिस्थितीच्या तुलनेत मृत्युदर कमी असल्याचे सुनिश्चित झाले आहे आणि त्यात सातत्याने घसरण होत आहे. मृत्युदर  आज 2.04% आहे.

कोविड -19 मुळे मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या केंद्रित प्रयत्नांमुळे प्रति दहा लाख लोकसंख्येमागे 91 या जागतिक सरासरीच्या तुलनेत भारताने 30 इतकी कमी मृत्यूची संख्या नोंदवली आहे.

कोविड -19 रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत,48,900 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, कोविड-19 मधून बरे होणाऱ्यांची एकूण संख्या 14,27,005 वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून  68.32% इतके झाले आहे.

सक्रीय म्हणजेच उपचार सुरु असलेल्या रुग्णांची एकूण संख्या 6,19,088 इतकी असून एकूण सकारात्मक रुग्णांच्या 29.64% आहे. हे रुग्ण वैद्यकीय देखरेखीखाली एकतर रुग्णालयात किंवा घरी अलगीकरणात आहेत.

विस्तारित निदान प्रयोगशाळा नेटवर्क आणि देशभरात सुलभ चाचणीच्या सुविधेमुळे कोविड-19 संसर्गासाठी भारतात एकूण 2,33,87,171 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 5,98,778 चाचण्या करण्यात आल्या. आज प्रति दहा लाख चाचण्यांमध्ये मोठी वाढ झाली असून ही संख्या 16947 इतकी झाली आहे. 

कोविड-19 च्या नैदानिक प्रयोगशाळांचा निरंतर विस्तार करण्यात येत आहे.  देशात 1396 प्रयोगशाळा आहेत, यापैकी 936 सरकारी तर 460 खाजगी प्रयोगशाळा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *