वैद्यकीय सेवा परिपूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी – मंत्री अशोक चव्हाण

नांदेड जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा-सुविधांचा पालकमंत्र्यांनी घेतला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा

नांदेड दि. 4 : जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या ही काळजीची बाब असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधत अधिक दक्षता घेण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग नव्याने उपलब्ध झाला असून जिल्हा रुग्णालयाचा स्वतंत्र प्रस्ताव शासनस्तरावर दाखल करुन घेण्याच्या सूचना यावेळी त्यांनी प्रशासनाला दिल्या. 

जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा मृत्यूदर, जिल्ह्यातील तपासणी मोहिम, आरोग्यविषयक अत्यावश्यक असणाऱ्या सेवा सुविधा याचा आढावा घेऊन शासनस्तरावर लागणारी मदत तात्काळ उपलब्ध करुन देता यावी यासाठी पालकमंत्री चव्हाण यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, आयुष संचालनालयाचे संचालक डॉ.कुलदिपराज कोहली यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्याच्या सर्व विभाग प्रमुखांसमवेत बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी नांदेड जिल्ह्यात कुठल्याही वैद्यकीय सेवा-सुविधा कमी पडता काम नयेत याचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले.

जिल्ह्यात खाजगी रुग्णालयांना ज्या दराने कोविड संदर्भात औषधोपचार व हॉस्पिटलच्या खर्चाची मर्यादा आखून दिली आहे त्या मर्यादेत नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सेवा सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशा प्रकारची मागणी जिल्ह्यातील अनेक आर्थिक सक्षम असलेल्या वर्गाने केली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात यासाठी जागा उपलब्ध आहे. या जागेवर विद्युतीकरण, बेडस् व फर्निचर, इतर अत्यावश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्यास जे लोक खाजगी दवाखान्यात खर्च देण्यापेक्षा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी खर्च करु इच्छितात त्यांना प्रायोगिक तत्वावर या सुविधा कशा देता येऊ शकतील याची पडताळणी करुन योग्य प्रस्ताव देण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांना दिले.

शासकीय रुग्णालयातील स्वच्छतेबाबत अनेकांच्या तक्रारी आल्या असून अपुऱ्या मनुष्यबळामुळे हा प्रश्न अधिक जटील होण्याचे निदर्शनास आले आहे. स्वच्छतेचा हा प्रश्न सोडविण्यासाठी या बैठकित खाजगीकरणातून हे काम करुन घेण्यास या बैठकित मंजुरी देण्यात आली. याचबरोबर जिल्ह्यात अधिपरिचारिकेची कमरता आहे. यासाठी नांदेड येथील नर्सींग कॉलेज यांच्याशी समन्वय साधून यातील गुणवत्ताधारक इच्छुकांना कोविड-19 च्या निर्देशांतर्गत सेवा घेण्यास वैद्यकीय सचिवांनी अनुमती दिली.     

जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा दर आजच्याघडीला 14 टक्क्यांपर्यंत जरी असला तरी याची काळजी करण्याचे कारण नाही. या तपासण्या जितक्या अधिक प्रमाणात वाढतील त्या प्रमाणात बाधितांचे प्रमाण हे दहा टक्क्यांपर्यंत स्थिरावत कालांतराने कमी होत जाईल. प्राथमिक अवस्थेतच जितक्या लवकर निदान होईल तेवढे बाधितांचे बरे होण्याचे प्रमाण सुधारेल, हे लक्षात घेत अधिकाधिक चाचण्यांवर भर द्यावा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *