विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीत ठाकरे गटाला डावलले

मुंबई ,११ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातले कामकाज निश्चित करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीत शिवसेनेच्या ठाकरे गटाला स्थान देण्यात आले नाही. मात्र, विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीत शिवसेनेच्या शिंदे गटाला सहभागी करून घेण्यात आलेले नाही.

राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाची कामकाज सल्लागार समिती आज गठित करण्यात आली. विधानसभेत शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट बहुमतात असल्यामुळे तेथे फक्त त्यांच्याच गटातल्या सदस्यांना स्थान देण्यात आले आहे. ठाकरे गटाकडून त्यांनी नेमलेले गटनेते अजय चौधरी तसेच प्रतोद सुनील प्रभू यांचा समितीत समावेश करण्यात यावा, अशी विनंती विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आली होती. मात्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही विनंती फेटाळून लावली. त्यानंतर आज ही समिती जाहीर करण्यात आली.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर या समितीचे प्रमुख आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, दादाजी भुसे, उदय सामंत, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे समितीचे सदस्य असतील. उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अॅड. आशिष शेलार, छगन भुजबळ आणि अमिन पटेल हे निमंत्रित सदस्य असतील.

विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीत शिवसेनेच्या ठाकरे गटाला स्थान देण्यात आले आहे. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे समितीच्या प्रमुख असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल परब, भाई गिरकर, प्रविण दरेकर आदींचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.