न्यायव्यवस्थेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न; संजय राऊतांनी केली केंद्रावर टीका

मुंबई,१९ मार्च  /प्रतिनिधी :-ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज कायदे मंत्री किरेन रिजिजू यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, “सध्या न्यायव्यवस्था खिश्यात टाकण्याचा प्रयत्न सुरु असून कायदे मंत्री किरण रिजीजू हे न्यायालयावर दबाव टाकत आहेत. पण, देशात अजूनही असे काही न्यायाधीश आहेत की, जे सरकारच्या दबावाखाली येत नाहीत. मात्र त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. देशातील न्यायव्यवस्था स्वतंत्र राहू नये, ती सत्ताधाऱ्यांची गुलाम राहावी, यासाठी धमकी दिली जात आहे.” असे आरोप त्यांनी केले आहेत.

ते म्हणाले की, “सरन्यायाधीशांच्या भूमिकेवर मी काही बोलू शकत नाही. पण देशाचे कायदेमंत्री किरेन रिजिजू वारंवार न्यायालयावर दबाव टाकत आहेत. त्यांचे कालचे विधानही तसेच होते. ‘काही आजी आणि माजी न्यायमूर्ती सरकारविरोधात मत व्यक्त करत आहेत,’ असे ते म्हणाले. म्हणजे आम्ही याचा अर्थ कसा घ्यायचा? ही धमकी आहे का? सरकारच्या विरोधामध्ये बोलणे म्हणजे देशद्रोह नव्हे. अशी विधाने करणे हा न्याययंत्रणेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे.” असे म्हणत त्यांनी किरेन रिजिजू यांनी केलेल्या विधानावर जोरदार टीका केली.