ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

मुंबई ,९ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे तीन दशकांहून अधिक काळ मनोरंजन करणारे मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे आज (९ ऑगस्ट) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ६५व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी (झावबावाडी, चर्नी रोड) अखेरचा श्वास घेतला. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ पाडणारे आणि मराठी चित्रपटसृष्टीत आणि नाट्यसृष्टीत आदराने घेतले जाणारे नाव म्हणजे प्रदीप पटनवर्धन. प्रदीप पटनवर्धन यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना त्यांनी बऱ्याच स्पर्धा गाजवल्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

दिलखुलास व्यक्तिमत्व, प्रभावी अभिनय, आणि लक्षवेधी संवादफेक यामुळे कायम प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या प्रदीप यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वात मोकळी पोकळी निर्माण झाली आहे. प्रदीप यांच्या गाजलेल्या नाटकांमध्ये मोरुची मावशीचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल.

मराठी नाटकं, चित्रपट आणि मालिका यातून आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या प्रदीप यांची ओळख मोरुची मावशीमुळे प्रेक्षकांच्या मनावर ठसली होती. त्यामुळे त्यांना ओळखले जाऊ लागले. केवळ विनोदी भूमिकाच नाही तर गंभीर स्वरुपाच्या भूमिका देखील त्यांनी तितक्याच प्रभावीपणे साकारल्या होत्या. त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. गिरगावात राहणारे प्रदीप हे गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे मनोरंजन विश्वापासून अलिप्त होते.

प्रदीप यांचा मनोरंजन विश्वातील प्रवास सांगायचा झाल्यास पहिल्यांदा उल्लेख करावा लागेल तो मोरुची मावशीचा. त्यानंतर त्यांनी नवरा माझा नवसाचा, लावू का लाथ, भुताळलेला, नवरा माझा भवरा, डोम, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

प्रदीप पटवर्धन हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. एक फुल चार हाफ (1991), डान्स पार्टी (1995), मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (2009), गोळा बेरीज (2012) आणि बॉम्बे वेल्वेट (2015), पोलिस लाईन (2016), नवरा माझा नवसाचा आणि 1234 (2016) या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.

मोरूची मावशी या नाटकाला प्रेक्षकांची विशेष लोकप्रियता मिळाली. दिली सुपारी बायकोची, बुवा तेथे बाया, सखी प्रिय सखी, बायकोची खंत यासारख्या नाटकांमध्ये देखील त्यांनी प्रमुख भूमिका साकारली.

‘निखळ, गुणी अभिनेता गमावला’-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांना श्रद्धांजली

मराठी रंगभूमी,  चित्रपट सृष्टीत आपल्या निखळ, निगर्वी स्वभावाने ओळख निर्माण करणारा गुणी अभिनेता आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री श्री. शिंदे शोकसंदेशात म्हणतात, ‘रंगभूमी, चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून प्रदीप पटवर्धन यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनामुळे एक सदाबहार, उमदा कलावंत मराठी कलासृष्टीने गमावला आहे. या गुणी अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली.

प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाने रंगभूमीवरील सदाबहार चेहरा हरपला!-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकसंवेदना

ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांची अकाली ‘एक्झिट’ मनाला चटका लावणारी आहे. रंगभूमीवरचा हसरा आणि सदाबहार चेहरा यापुढे दिसणार नाही, याचे अतिशय वाईट वाटते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

जेव्हा फक्त दूरदर्शनचा जमाना होता, त्या मनोरंजनाच्या प्रारंभीच्या काळात अनेक मालिकांच्या माध्यमांतून घराघरात ते पोहोचले आणि नंतर अनेक नाटकांच्या माध्यमातून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात आपली स्वत:ची अमिट अशी छाप उमटवली. ‘मोरुची मावशी’ या नाटकाचे स्मरण होताना प्रत्येक वेळी प्रदीप पटवर्धन यांची आठवण होईल. अनेक चित्रपट सुद्धा त्यांनी गाजवले. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तेष्ट आणि चाहते यांच्या दु:खात मी सहभागी आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.