शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी अभ्यासक्रमात आवश्यक ते बदल करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

धुळे,३० जुलै /प्रतिनिधी :- शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी राज्यातील कृषी अभ्यासक्रमांत आवश्यक ते बदल करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस केले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत आज दोंडाईचा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात दादासाहेब रावल उद्योग समूहाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ग्लुकोज फार्मास्युटिकल नवीन प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा, स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त कृषी महाविद्यालय इमारत व बहुउद्देशीय संकुल इमारतीचे उद्घाटन, छत्रपती शिवाजी महाराज तसेच श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल यांच्या स्मारकास अभिवादन, लोकनेते सरकारसाहेब रावल यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सहकार महर्षी दादासाहेब रावल सहकारी सूतगिरणीचे ई भूमिपूजन, 75 हजार रोपे वाटपाचा कार्यक्रम, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 फूट उंच असलेल्या ध्वजस्तंभाचा लोकार्पण सोहळा यानिमित्त दादासाहेब रावल क्रीडा संकुलात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला जि.प अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, महापौर प्रदीप कर्पे, माजी संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार अमरीश पटेल, आमदार सर्वश्री जयकुमार रावल, गिरीश महाजन, राजेश पाडवी, संजय सावकारे, काशीराम पावरा, राहुल ढिकले, श्रीमती सीमाताई हिरे, उद्योगपती सरकारसाहेब उर्फे जितेंद्रसिंग रावल, नयन कुवरजी रावल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, स्मिता वाघ, आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, अलीकडच्या काळामध्ये शेतीमध्ये नवनवीन संशोधन होत आहे ते बदल विद्यार्थ्यांना अवगत होण्यासाठी राज्याच्या कृषी अभ्यासक्रमात बदल करणे आवश्यक आहे. यामुळे रासायनिक खताचा वापर कमी करुन जास्तीत जास्त जैविक शेती कशी करता येईल, जैविक खताचा वापर कमीत कमी करून उत्पादकता वाढविण्यासाठी शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल अशा अनेक गोष्टी कृषी महाविद्यालयात शिकवता येतील त्यामुळे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार कृषी अभ्यासक्रमात बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे असे त्यांनी सांगितले. सिंचनाच्या क्षेत्रात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या विभागातील सिंचनाचे प्रकल्प येत्या काळात पूर्ण करणार असून नदी नाल्यातील पाणी जमिनीत अडवण्यासाठी जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेला सुधारित मान्यता देऊन सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. उत्तर महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रास चालना देण्यासाठी यावर्षांपासून चेतक फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, गिरीश महाजन सरकारसाहेब रावल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रारंभी उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते युनिव्हर्सल स्टार्च केम अलाईड लिमिटेड, दोंडाईचा इमारतीचा लोकार्पण सोहळा, स्वोद्वारक विद्यार्थी संस्थेची बहुउद्देशीय इमारतीचे उद्घाटन, विकासरत्न सरकारसाहेब रावल कृषि महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन, श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल यांच्या स्मारकास अभिवादन, 75 फूट उंच ध्वजस्तंभाचे उद्घाटन करण्यात आले. सहकारमहर्षी दादासाहेब रावल सहकारी सूतगिरणीचे ई भूमिपूजन, तसेच प्रातिनिधीक स्वरुपात 75 हजार वृक्ष वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.