नाशिक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार:गोदावरीचे रौद्र रूप

३० गावांचा संपर्क तुटला, एकजण गेला वाहून, ६५ वृद्धांना वाचवण्यात यश

नाशिक ,११ जुलै /प्रतिनिधी :- गुरुवारपासून सुरू झालेल्या पावसाच्या पुनर्वसू नक्षत्राने जिल्ह्यात जोरदार आगमन केले असल्यामुळे जिल्ह्यात धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तर सततच्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या ३० गावांचा संपर्क तुटला असून शहरातील एका धर्मशाळेत अडकलेल्या ६५ वृद्धांना महानगरपालिकेने रेस्क्यू ऑपरेशन करून वाचविले आहे. एकजण वाहून गेल्याची घटना देखील घडली आहे.

पाऊस सुरू झाल्यापासून मृग आणि आद्रा या दोन नक्षत्रात अल्प पाऊस झाला. सहा जुलैपासून सुरू झालेल्या पुनर्वसू नक्षत्राने जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे जिल्ह्यात समाधानाचे वातावरण नागरिकांमध्ये दिसून येत होते. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात ६५ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील २४ तासांमध्ये नाशिक जिल्ह्यात ७७.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे नाशिक वेधशाळेने सांगितले. येणाऱ्या २४ तासांमध्ये असाच पाऊस होण्याची शक्यता वेधशाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. १४ जुलैपर्यंत नाशिक जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ देण्यात आल्याचेही वेधशाळेच्या वतीने सांगण्यात आले.

nashik godavari river flood news

रविवारी संध्याकाळी आठ वाजेपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला पूर आला. पुराचे मापदंड असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या छातीच्या वरपर्यंत पाणी लागल्याने नदीकाठच्या भाजी बाजार, बालाजी कोट, य. म. पटांगण भाजी बाजार, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी जमा झाले आहे. तसेच या पावसामुळे शहरातील जनजीवनावर देखील परिणाम झाला आहे. तसेच शहरातील नासर्डी नदी भरून वाहत आहे. याच बरोबर शहरातील वाघाडी व इतर नद्यांना पूर आला आहे. शहरातील होळकर १० हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरण क्षेत्रात तसेच त्र्यंबकेश्वर आणि गोदावरी नदी परिसरात सातत्याने पाऊस सुरू असल्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने सुमारे दहा हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. सुरगाणा तालुक्यातील पळसन, भारी अंबोडी खुंटविहार, आमदा, उमराणे हस्ते व आमटी नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे.

सुरगाणा तालुक्यात जोरदार पाऊस

सकाळपासून पाऊस सुरू असल्यामुळे सुरगाणा तालुक्यातील नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पैसे खुर्द या पेठ तालुक्यातील पुंडलिक लक्ष्मण महाक हा वृद्ध पाण्यामध्ये वाहून गेला. त्याच्या शोध सुरू असून संध्याकाळी उशिरापर्यंत त्याचा मृतदेह सापडला नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

सतत सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील मुकणे ५६.५६ वाकी १०.८७, भाव ५०.६, भाहुली ६४.८०,वालदेवी २०.९, गंगापूर ६५.२२, गौतमी गोदावरी ४३.६९, कळवा ७०.९०, आळंदी ४६.५०, भोजापूर १०.६, पालखेड ५०.५५, करंजवण ४९.५२, ओझरखेड ४०.५०, तिसगाव शून्य, पुणे गाव ७०.८२, चणकापूर ५७.८७, हरणबारी ७०.४७, केळझर २१.७६, नागासाकी ५.७८ दक्षलक्ष पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून ४१,०६५ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये ५०.७७ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी हाच पाणीसाठा २२.९५ टक्के इतका होता.

नाशिक शहरात असलेल्या संत गाडगेबाबा धर्म शाळेत आश्रय घेणाऱ्या ६५ वृद्धांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते या ठिकाणी फसले होते. त्यांना नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या रेस्क्यू ऑपरेशन करून जवानांनी वाचविले आहे. दोन तास हे रेस्क्यू ऑपरेशन घडले. त्यानंतर या जवानांना सुखरूप वाचविण्यात यश आल्याची माहिती पालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख संजय बैरागी यांनी दिली.

इगतपुरीत जोरदार पाऊस

इगतपुरी तालुक्यात विक्रमी २५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक नदी, नाले दुथडी भरून वाहू लागल्याने धरणांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. इगतपुरी तालुक्यातील भाम धरणाच्या नवीन पुनर्वसनस्थळाच्यावर असलेल्या दरेवाडी येथे पावसाने डोंगराचा भाग खचल्यामुळे मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर कोसळला त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याची घटना देखील घडली आहे. तातडीने या ठिकाणी आपत्कालीन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले असून त्यांनी हा ढिगारा संध्याकाळी उशिरा हटविला आहे.

दारणा धरण ७०.२१ टक्के भरल्याने धरणातून १५ हजार ८९८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तसेच तालुक्यातील सर्व धरणांमधून फक्त दारणा धरणातून विसर्ग सोडण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता सुरेश जाचक यांनी दिली. इगतपुरी तालुक्यात पावसामुळे शेतीच्या कामाने देखील वेग घेतला आहे. भात लावणीच्या वेग वाढला आहे.

इगतपुरी तालुक्यातील अस्वली मुंडेगाव रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे पर्यायी रस्ता करण्यात आला होता. तो रस्ता पावसामुळे वाहून गेल्याने अस्वली बेळगाव कुर्हे यासह दहा ते पंधरा गावांचा संपर्क तुटला आहे. हा संपर्क प्रस्थापित करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू असल्याचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी सांगितले.

वाहतूक विस्कळीत

सतत सतत सुरू असलेल्या पावसामुळे नाशिक-मुंबई महामार्गावर इगतपुरी वाडीवरे या दरम्यान मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. नाशिक -पुणे महामार्गावर वाहतुकीवर परिणाम झाला आहे. नाशिक पुणे महामार्गावर सिन्नर शिंदे दरम्यान मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

नदीकाठावर पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये : गंगाथरन

जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून काही भागात अतिवृष्टीही झाली आहे. अगामी चार दिवसांत जिल्ह्यात अतिप्रमाणावर पाऊस व अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने धरण प्रकल्पातून विसर्गही सुरू असून प्रसंगी विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने नदीकाठावरील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच नदीकाठावर पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष गंगाथरन डी. यांनी केले आहे. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनाही नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहनही गंगाथरन डी. यांनी केले आहे.