भाजपाच्या स्थानिक नेत्यांचा करिष्मा नसल्याने केंद्रातील नेतृत्वाला करावा लागतो प्रचार-विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा भाजपला खोचक टोला

पुणे  ,५ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- केंद्रातील भाजपाच्या मोठया नेत्याला मुंबईत येऊन मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच भाषण ठोकाव लागतं यातच शिवसेनेचा नैतिक विजय झाला आहे. केंद्रातील नेतृत्वाला मुंबईत निवडणुकीसाठी यावं लागतं म्हणजे राज्यातील स्थानिक नेत्यांमध्ये ती शक्ती करिष्मा नाही का असा प्रश्न उपस्थित करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावर खोचक टोला लगावला. आज दानवे हे पुण्यातील मानाच्या गणपती दर्शनासाठी पुणे दौऱ्यावर होते त्यावेळी ते बोलत होते.

Image
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुण्यातील मानाचा असणारा गणपती श्रीमंत दगडुशेठ हलवाई येथे आरती केली व श्रीगणेशाचे आशीर्वाद घेतले.

मागील निवडणुकीतही भाजपने अशीच घोषणा केली होती, त्यावेळी मोदींची लाट व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तरी शिवसेनेने विजय प्राप्त केला होता. मात्र यावेळी फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. शिवसैनिकांमध्ये जिद्द व उत्साह पाहायला मिळतोय. निवडणूक नसतानाही शिवसेनेची शक्ती जनतेत पाहायला मिळते, त्यामुळे शिवसेनेचा दैदिप्यमान विजय होईल असा विश्वास दानवे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीबाबत बोलताना व्यक्त केला.

“भाजप मुंबई आमची सातत्याने म्हणते. मात्र सर्व कंपन्या, व्यापार अहमदाबादला नेतेय. त्यामुळे मुंबईकर व महाराष्ट्रातील जनतेत चीड आहे.
येणाऱ्या काळात जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही,”असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.
तर शिवसेना आजही जमिनीवर आहे. शिवसेनेला जमीन दाखवण्याची गरज नाही.ते हवेत आहेत, त्यांना शिवसेना आकाश दाखवेल असा इशारा देत दानवे यांनी शिवसेनेवर अमित शाह यांच्या टीकेवर पलटवार केला.

अमित शहा म्हणत असतील खऱ्या शिवसेनेसोबत युती केली तर यापूर्वी मातोश्रीवर नतमस्तक होत होते त्याचं काय असा प्रश्न करत दानवे यांनी खरी शिवसेना कोणती आहे हे जनतेला चांगले माहिती आहे, असा टोला लगावला.

शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवतीर्थावरच दसरा मेळावा होतो. एक मैदान, एक नेता व एक झेंडा शिवसेना म्हणते. यंदाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा होईल असे दानवे यांनी ठणकावून सांगितले.

ज्या ठाकरे यांनी लाव रे तो व्हिडीओ म्हणत कोणाची तरी बदनामी केली होती. त्यांना आता भाजपसोबत घेणार काय असा सवाल दानवे यांनी केला. तर शिंदेच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीवर दानवे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा वसा उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवला. त्यामुळे बाकीच्या ठाकरेंच महत्त्व अधोरेखित होत नसल्याचे दानवे म्हणाले.

सरकारच्या निष्काळजीपणा व अकार्यक्षमतेमुळे पूरग्रस्तांना मदत मिळण्यास विलंब-विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका

नाशिक – राज्य सरकारचा निष्काळजीपणा व अकार्यक्षमतेमुळे नाशिकसह राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत मिळण्यास विलंब होत असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. विरोधी पक्षनेते दानवे यांनी आज नाशिक जिल्ह्यातील ता. वांजरवाडी व सिन्नर येथील
मुसळधार पावसामुळे उदभवलेल्या पूरपरिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला त्यावेळी माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते.

Image


एकप्रकारे सरकारची प्रशासनावरील पकड ढिली झाल्याने पूरग्रस्तांना मदत मिळण्यास उशीर होत असून याला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.
पूर ओसरून आज आठवडा झाला तरी पूरग्रस्त नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याने नागरिक, शेतकरी यांना अद्याप मदत मिळाली नाही. तहसीलदार ते जिल्हाधिकारी यांच्याकडे अद्याप पंचनामे आले नसल्याचे समोर आले आहे. नाशिक व सिन्नर शहरात मोठया प्रमाणात नागरिकांचे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. असे असतानाही सरकारी यंत्रणा प्रभावीपणे काम करताना दिसत नाही.

Image


पूरग्रस्तांना सरकारकडून मदत मिळत नाही. मात्र शिवसेना त्यांच्या मदतीसाठी उभी राहील अशी ग्वाही दानवे यांनी दिली.
सिन्नर तालुक्यात अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या कुसुमबाई तानाजी घोरपडे व कविता गडक यांच्या घरांच्या नुकसानाची पाहणी दानवे यांनी केली. या पुरामुळे नागरीकांचे घरं वाहून गेल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत, त्यांना तात्काळ निवारा व जीवनावश्यक वस्तू उपलब्ध झाल्या पाहिजेत अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

दुर्गम भागातील बंधाऱ्याची केली पाहणी
सोनंबे ता. सिन्नर येथे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या दुर्गम भागात असलेल्या गुरदरी बंधाऱ्याची पाहणी दानवे यांनी ट्रॅक्टरने काही अंतर जाऊन व नंतर पुढे पायी चालत केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत अधिकाऱ्यांना बंधाऱ्याचे कामही तातडीने हाती घेण्याच्या सूचना केल्या.
यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे,माजी आमदार योगेश बबनराव घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर,तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर गाडे, सोनांबे गावचे सरपंच डॉ.रवींद्र पवार, स्थानिक गावकरी व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.