खासदार कुठेही गेले तरी मतदार शिवसेनेच्या बाजूने : संजय राऊत

मुंबई ,२ जुलै /प्रतिनिधी :- शिवसेनेच्या १९ पैकी १४ खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घ्यावे अशी भूमिका पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली. मात्र खासदारांनी आपली भूमिका व्यक्त केल्यानंतरही पक्षाकडून एकनाथ शिंदे यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे नेतेपदावरुन हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ते १४ खासदार आता बंडखोरी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आले असता त्यांनी सूचक विधान केले आहे.

“खासदार फुटण्याच्या मार्गावर आहेत असे बोलणे चुकीचे आहे. काल आमच्या पक्षाच्या खासदारांची बैठक झाली. पण मी त्या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही. कारण त्याचवेळी मला भाजपाच्या एका शाखेने बोलावले होते. बैठकीबाबत माझे पक्षप्रमुखांशी बोलणे झाले आहे. खासदारांच्या भावना काय आहेत त्यावर पक्ष प्रमुखांनी चर्चा केली. चर्चा होऊ शकते. खासदार गेले किंवा जातात असे होत नाही. पण असे घडले तरी शिवसेनेत आमदार आणि खासदार निवडून आणण्याची पूर्ण ताकद आहे. शेवटी खासदार कुठेही गेले तरी खालची कार्यकर्त्यांची फळी तयार असते. मतदार देखील पूर्णपणे शिवसेनेच्या बाजूने आहेत. हे तुम्ही लक्षात घ्यायला हवे”, असे संजय राऊत यांनी सांगितले.

“शिवसेना सोडून कुणी शिवसैनिक होऊ शकत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत. जिथं ठाकरे तिथं शिवसेना. तुम्ही वेगळी चूल मांडली असली तरी मूळ शिवसेना ठाकरेंपासून कुणी हिरावून घेऊ शकत नाही. माझ्यावर कितीही दबाव आणला गेला असता तरी मी शिवसेना सोडली नसती. मलाही पाडण्याचे प्रयत्न झाले. मी निवडणूक हरलो असतो तरी पक्ष सोडला नसता. एकनाथ शिंदेंवर पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांना नेतेपदावरुन काढण्याचा निर्णय शिष्टमंडळानं घेतला आहे. मी बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. काही झाले तरी गुवाहाटीला जाणाऱ्यातला मी नाही”, असेही संजय राऊत म्हणाले.