विकास निधीसाठी पालकमंत्री सुभाष देसाई 10 टक्के कमिशन घ्यायचे – आ. बोरणारे यांचा आरोप

वैजापूर,२३ जुलै /प्रतिनिधी :-औरंगाबाद जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई हे विकास निधीसाठी जिल्ह्यातील आमदारांकडून 10 टक्के कमीशन घ्यायचे असा आरोप वैजापूर मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे यांनी केला आहे. एक कोटींचा निधी दिला तर ते त्यासाठी 10 लाख रुपये कमीशन मागायचे त्यांनी माझ्याकडून 10 टक्क्यांचे कमीशन घेतले असा आरोप बोरनारे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे.

पुढे बोलतांना आ.बोरनारे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार असताना विकासनिधीसाठी शिवेसेना नेत्यांकडून नेहमीच आडकाठी केली गेली. त्यामुळे राज्यभरातील शिवसेना आमदारांनी उठाव केला. आम्हाला जिथे अडचण आली त्यावेळी आम्ही एकनाथ शिंदेंकडे तक्रार करायचो. त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही बाहेर पडलो. आमच्यावर ठाकरे कुटुंबीयांनी काही जरी आरोप केले तरी आम्ही काही बोलणार नाही, आमच्यावरील होणारा अन्याय एकनाथ शिंदे यांनी दूर केला.
चमच्यांना सोडणार नाही
पुढे बोरनारे म्हणाले की, शिवसेना वाढवण्यासाठी आम्ही 25 वर्षे रक्त आटवले. राष्ट्रवादीसोबत आघाडी केली तेव्हा भाजपतर्फे आम्हाला गद्दार म्हणण्यात आले. आता आम्ही भाजपशी युती केली आहे. ठाकरे कुटुंबीयांकडून आता आमच्यावर आरोप केले जात आहेत. आदित्य ठाकरे आम्हाला वारंवार गद्दार म्हणत आहेत, मात्र ठाकरे कुटुंबाबद्दल आम्ही बोलणार नाही पण त्यांच्या चमच्यांना सोडणार नाही.
खैरेंबद्दल माहिती
दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी बंडखोरांवर टीकास्त्र केले आहे. सत्तेच्या लालसेपायी आणि दबावापोटी आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात शामिल झाले. त्यावर उत्तर देताना बोरनारे म्हणाले की, चंद्रकांत खैरे खूप बोलतात, पण एक दिवस त्यांचे कपडे उतरविण. मला त्यांच्याबद्दल खूप माहिती आहे, ती कधी ना कधी बाहेर काढणारच…