मुंबई पोलिसांचा संडे स्ट्रीट उपक्रम कौतुकास्पद – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

मुंबई : मुंबई पोलिसांच्या वतीने नरिमन पॉईंट येथे संडे स्ट्रीट उपक्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह अभिनेता अक्षय कुमार उपस्थित होते. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

मुंबई शहरातील लोकांना तणावमुक्त वातावरणामध्ये वावरता यावं. त्यांना मनोरंजन, योगा, जॉगिंग, सायकलिंग आणि सांस्कृतिक खेळ यांसारख्या कार्यक्रमांचा आनंद घेता यावा याकरिता मुंबई पोलिसांमार्फत ‘संडे स्ट्रीट‘ संकल्पना राबवण्यात येत आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, मुंबई पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

गृहमंत्री श्री.वळसे-पाटील म्हणाले, संडे स्ट्रीट अतिशय चांगला उपक्रम असून तो सातत्याने सुरु राहिल असा विश्वास वाटतो. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील विविध भागात याचे आयोजन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून पोलिसांमधील कलागुणांना वाव मिळतो आहे, ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे.

यावेळी अभिनेता अक्षय कुमार म्हणाले, कोविड काळात सर्वत्र शांतता होती. परंतु आता दिसणारे हे चित्र दिलासादायक आहे. संडे स्ट्रीट कल्पना कायम स्वरूपी राबवावी. पोलिसांचे लोकांसोबत संबंध दृढ करण्यासाठी हा चांगला उपक्रम आहे.

मुंबईमध्ये आज एकूण 13 ठिकाणी ‘संडे स्ट्रीट‘ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई पोलिसांच्या या उपक्रमाचे मुंबईकरांनी स्वागत केले असून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.