राज्यसभेची मतमोजणी रखडली

तीन मतं अवैध ठरवावीत भाजपची आयोगाकडे तक्रार

मुंबई : महाविकास आघाडीचे जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकुर आणि सुहास कांदे यांचे मत बाद करावे अशी भाजपने केलेल्या तक्रारीची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली आहे. भाजपने राज्यसभेच्या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

एकूण २८५ आमदारांनी मतदान केले. चार वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार होती. दरम्यान, भाजपकडून या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आला. भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र लिहीत तशी तक्रार घेतली

भाजपने केलेल्या या तक्रारीची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली. त्यामुळे सध्यातरी मतमोजणीची प्रक्रिया रखडली आहे.

महाविकास आघाडीने घेतला आक्षेप
भाजपच्या रवी राणा आणि सुधीर मुंनगटीवार यांच्यावर महाविकास आघाडीनं आक्षेप घेतलाय. मविआनं तसं पत्रही निवडणूक आयोगाला लिहिलंय. रवी राणा मतदानावेळी हनुमान चालिसा घेऊन आले होते. तर सुधीर मुनगंटीवारांनी आपली मतपत्रिका चंद्रशेखर बावनकुळेंच्या हातात दिल्याचा आक्षेप घेण्यात आलाय. काँग्रेस पोलिंग एजंट अमर राजूरकर यांनी हा आक्षेप नोंदवलाय. तर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा आक्षेप फेटाळून लावला.