भाजपचे धनंजय महाडिक विजयी, शिवसेनेचे संजय पवार पराभूत

मुंबई,११ जून  /प्रतिनिधी :- राज्यसभा निवडणुकीवरुन  महाराष्ट्रामध्ये मोठे राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. अखेरीस  ९ तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला आहे. महाविकास आघाडीचे ३ उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन  उमेदवार विजयी झाले आहे.

Image

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे दोन मल्ल मैदानात होते. त्यामध्ये आता धनंजय महाडिकांनी बाजी मारली आहे. भाजपने धनंजय महाडिकांच्या रुपाने सहावा उमेदवार रिंगणात उतरवल्याची खेळी यशस्वी झाली असून त्यांच्या विजयाने महाविकास आघाडी, खासकरून शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.  

भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिकांना महाविकास आघाडीचे काही मते  मिळाल्याचे  स्पष्ट झाले  आहे. त्यामुळे भाजपने शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवला आहे. 

भाजपचे संख्याबळ १२३ इतकी झाले होते. राज्यसभेचे दोन उमेदवार निवडून आणल्यानंतर भाजपकडे २८ मते राहत होती. पण, पियूष गोयल यांना ४८ मते  मिळाली आणि अनिल बोंडे यांनाही ४८ मते  मिळाली. त्यानंतर पहिल्या पसंतीची २७ मते ही धनंजय महाडिक यांना मिळाली आहे.तर महाडिक यांच्याविरोधात उभे असलेले शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना ३३ मतं मिळाली आहे.  त्यामुळे अपक्षांची ९ मते फुटली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. धनंजय महाडिक हे ४१ मतं घेऊन विजयी झाले आहे. तर संजय पवार यांना ३३ मते  मिळाली आहे.

भाजपकडे एकूण १०६ आमदार आणि ७ अपक्ष समर्थक मिळून ११३ आकडा होता.  त्यामुळे १२३  मते भाजपला पहिल्या पसंतीची मिळाली. यात ४८मते  अनिल बोंडे आणि  ४८ मते गोयल यांना मिळाली. त्यामुळे एकूण 96 मते  झाली. त्यानंतर धनंजय महाडिक यांना १७ मते पहिल्या पसंतीची मिळाली.  २७ पैकी १७ मते भाजपची होती. उरली 10 मते बाकी होती. यात  3 मते  बविआने महाडिक यांना दिली.  १ मत मनसेने दिले . त्यानंतर ९ मते  अपक्षांची असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

भाजपचे पियूष गोयल आणि अनिल बोंडे पहिल्या फेरीत विजयी
पियूष गोयल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जातात. मागील वेळी राज्यसभेच्या नेतेपदी निवड करुन मोदींनी हेच अधोरेखित केलं. पियूष गोयल यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी सौहार्दपूर्ण संबंध विचारात घेऊन, त्यांच्यावर ही जबाबदारी दिली गेली. ही जबाबदारी पीयूष गोयल यांनी उत्तमरित्या सांभाळली. सध्या त्यांच्यावर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाची जबाबदारी आहे. आता ते पुन्हा खासदार झाले आहेत. पियुष गोयल यांना ४८ मतं मिळाली आहेत.भाजपनं माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांना उमेदवारी दिली होती. अनिल बोंडे देखील विजयी झाले आहेत. अनिल बोंडे यांना ४८ मते मिळाली आहेत.

पियूष गोयल – ४८

अनिल बोंडे – ४८ 

संजय राऊत  ४१

प्रफुल्ल पटेल – ४३

इम्रान प्रतापगढी  ४४

संजय पवार – ३३

धनंजय महाडिक – ४१

तर, निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दरम्यान, शिवसेनेचे नेते संजय राऊत, काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी विजयी झाले आहेत.  तर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल  आणि काँग्रेसचे नेते इम्रान प्रतापगढी विजयी झाले आहे.

सुहास कांदेंचं मत बाद; आव्हाड, ठाकूर, मुनगंटीवारांची मतदान वैध

राज्यसभेच्या सात जागांसाठी आज मतदान पार पडलं. सर्व आमदारांनी आज मतदान केलं. पण मतदानानंतर बराचवेळ झाला तरी मतमोजणीला सुरुवात झाली नाही. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीचा निकाल रखडला होता. अखेरीस निवडणूक आयोगाने बैठक घेतली आणि रात्री उशिरा याबद्दल निर्णय दिला आहे.

शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्यात आले आहे. पण, जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर यांचे मत वैध्य धरण्यात आले आहे. तर सुधीर मुनगंटीवार आणि रवी राणा यांचे हे मत वैध्य धरण्यात आले आहे. त्यामुळे मतमोजणीचा मार्ग मोकळा झाला होता.

भाजपच्या धनंजय महाडिकांचा हा विजय आणि शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव हा महाविकास आघाडीच्या, खासकरून शिवसेनेच्या जिव्हारी लागणारा आहे. सहाव्या जागेसाठी मतदान करताना महाविकास आघाडीची सहा मतं फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. 

‘निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती’ असं देवेंद्र फडणवीसांनी महाडिकांच्या विजयानंतर ट्वीट केलं आहे. सुरुवातीपासून शिवसेनेच्या संजय पवारांचे पारडे जड असतानाही शेवटी भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. यामध्ये देवेंद्र फडणीसांनी महाविकास आघाडीकडे शरद पवार यांच्यासारखा दिग्गज समोर असतानाही अचूक स्ट्रॅटेजी आखली आणि विजय खेचून आणला. 

मतांचे समीकरण

संजय पवार यांना मिळालेली मतं

33+2 = 34

संजय पवार यांना 33 मते मिळाली त्यात प्रफुल्ल पटेल यांना मिळालेली 43 मते त्यातील 41 चा कोटा पूर्ण करत उरलेली 2 तर प्रतापगडी यांना मिळालेली 44 मते त्यातील 41 चा कोटा पाहता 3 मत शिल्लक राहतात. त्यामुळे संजय पवार यांना 38 मते मिळाली.

धनंजय महाडिक यांना मिळालेली मतं.

27+7+7 = 41

धनंजय महाडिक यांना 27 तर पियुष गोयल यांना 48 मते मिळाली त्यातील 41 चा कोटा पूर्ण करत 7 अधिक मते. तर अनिल बोंडे यांना ही 48 मते मिळाली त्यातील 41 चा कोटा पूर्ण करत 7 अधिक मते मिळाली. 27 अधिक पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांची 14 मते अशी धनंजय महाडिक यांना 41 मते मिळाली यामध्ये महाडिक यांचा विजय झाला आहे.

आता विधानपरिषदेकडे लक्ष्य

राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये तिसरा उमेदवार निवडून आणताना भाजपने महाविकास आघाडीची मतं फोडली आहेत. त्यामुळे आता दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानपरिषदेसाठी भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. विधानपरिषदेची निवडणूकही गुप्त मतदानाने होणार असल्याने महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे.