भारताला २१ जुलैला नवे राष्ट्रपती मिळणार

राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैला होणार मतदान

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली आहे. पुढील महिन्यात १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान पार पडणार आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे आता राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत राष्ट्रपती निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी १५ जून ते २९ जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. त्यानंतर २ जुलै पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. निवडणूक बिनविरोध न झाल्यास १८ जुलै रोजी मतदान होणार असून २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलै रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. निवडणुकीत मतदानासाठी विशेष शाई पेन देण्यात येणार आहे. मतदान करण्यासाठी १,२,३ अशा पर्यायांची निवड करावी लागेल. पहिली पसंती न दिल्यास, मतदान रद्द केले जाईल.

या काळात राजकीय पक्ष व्हीप जारी करू शकत नाही. संसद आणि विधानसभेत मतदान होणार असून, राज्यसभेचे महासचिव हे निवडणूक प्रभारी असतील. याशिवाय कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या निवडणुकीत खासदाराच्या मतांचे मूल्य ७०० असेल. यासोबतच तुरुंगात असलेले प्रतिनिधी मतदान करू शकतात, त्यांना पॅरोलसाठी अर्ज करावा. २०२२ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण ४,८०९ मतदार मतदान करणार आहेत, अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली.