अमृत महोत्सवाच्या स्मृत्यर्थ नाणी:1रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपये मूल्याच्या नाण्यांच्या विशेष मालिकेचे अनावरण

पंतप्रधानांच्या हस्ते केंद्रीय अर्थ मंत्रालय तसेच केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांच्यातर्फे आयोजित आयकॉनिक सप्ताहाचे उद्‌घाटन

नवी दिल्ली ,६जून  /प्रतिनिधी :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय अर्थ तसेच केंद्रीय कॉर्पोरेट मंत्रालयातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित आयकॉनिक विक अर्थात विशेष सप्ताहाचे उद्‌घाटन केले. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात झालेल्या मुख्य कार्यक्रमामध्ये देशभरातील 75 ठिकाणांहून कर विभागाचे अधिकारी तसेच उद्योग  क्षेत्राशी संबंधित प्रमुख व्यक्ती आभासी पद्धतीने सहभागी झाल्या. 

अमृत महोत्सवाच्या स्मृत्यर्थ नाणी

पंतप्रधानांनी यावेळी, 1रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये आणि  20 रुपये मूल्याच्या नाण्यांच्या विशेष मालिकेचे अनावरण देखील केले. या विशेष मालिकेतील नाण्यांवर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या\ बोधचिन्हाची संकल्पना कोरलेली आहे तसेच दृष्टीदोष असणाऱ्या व्यक्तींना देखील या नाण्यांचे मूल्य सहजपणे ओळखता येईल अशा प्रकारे ही नाणी तयार करण्यात आली आहेत.

जन समर्थ पोर्टल

या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी सरकारच्या सर्व कर्ज योजनांना जोडणाऱ्या जन  समर्थ पोर्टल या एकीकृत डिजिटल पोर्टलची सुरुवात केली.हे पोर्टल सरकारच्या सर्व कर्ज-संलग्न योजनांसाठी संपूर्ण माहिती मिळण्याची सुनिश्चिती करते. या पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना शैक्षणिक कर्ज, कृषी-पायाभूत सुविधाविषयक कर्ज, व्यापारातील व्यवहारांसाठीचे कर्ज, उपजीविकेसाठीचे कर्ज इत्यादी विविध प्रकारच्या कर्जांसाठी उपलब्ध असणाऱ्या सरकारी योजनांसाठीची पात्रता तपासता येईल, तसेच या पोर्टलचा वापर करून योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आणि त्या प्रस्तावाला डिजिटल मंजुरी मिळविणे ही कामे देखील करता येतील.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, भूतकाळात देशाने सरकार-केन्द्री प्रशासनाचा ताण सोसला आहे. पण आज 21व्या शतकातील भारत, लोक-केन्द्री प्रशासनाच्या दृष्टीकोनासह प्रगती करत आहे.यापूर्वी सरकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी सरकारकडे जाणे ही लोकांची जबाबदारी समजली जात होती. मात्र आता, प्रशासनाला जनतेकडे घेऊन जाणे आणि विविध मंत्रालये आणि संकेतस्थळांच्या फेऱ्या मारण्यापासून  त्यांना वाचविणे यावर भर दिला जात आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

“जन समर्थ पोर्टल या कर्जाशी संलग्न सरकारी योजनांसाठी राष्ट्रीय पोर्टलची सुरुवात हे या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. या पोर्टलच्या वापरामुळे, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी तसेच एमएसएमई उद्योजक यांच्या जीवनात सुधारणा घडून येणार आहे आणि  त्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मदत होणार आहे,” असे पंतप्रधान  म्हणाले.

कर विभागाच्या अधिकाऱ्यांची बदलती भूमिका

आयकर विभागाच्या प्रमुख मुख्य आयुक्त गीता रवीचंद्रन यांच्यासह आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सीबीआयसी तसेच बँका, विमा कंपन्या आणि व्यापारी संघटनांचे प्रमुख मुंबईहून ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमात सहभागी झाले.

प्रत्यक्ष कर संकलनात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या मुंबईतील कर आस्थापनेच्या प्रमुख गीता रविचंद्रन यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींना सांगितले की आता करविषयक प्रक्रिया सोप्या करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. कर संकलन देशाच्या हितासाठीच असते असे त्या म्हणाल्या. करविभागाशी संबंधित व्यक्तींच्या बदलत्या भूमिकेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की आता कर अधिकाऱ्याची भूमिका सक्तवसुली करणारा अशी राहिली नसून करविषयक सुविधा दात्याची झाली आहे, आता कर विभागाचे अधिकारी लोकांच्या तक्रारींचे निवारण करून त्यांना नियमपालन करण्यासाठी सक्षम करतात

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा विशेष सप्ताह

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सुरु असलेल्या सोहळ्याचा भाग म्हणून आयोजित केलेल्या या विशेष सप्ताहात  केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ आणि सीमा शुल्क विभाग इत्यादी कार्यालयांतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गोवा येथे शनिवारी 11 जून 2022 रोजी होणाऱ्या कार्यक्रमात या विशेष सप्ताहाचा समारोप करण्यात येईल.