देशात १०३ टक्के पाऊस होणार:हवामान विभागाचा मान्सूनबद्दलचा ताजा अंदाज

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस

पुणे ,३१ मे /प्रतिनिधी :- नैऋत्य मोसमी पावसाने नुकताच भारतात प्रवेश केला असताना भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी (३१ मे) जून ते सप्टेंबर या कालावधीतील मोसमी पावसाचा अंदाज जाहीर केला. त्यानुसार देशात यंदा सरासरीच्या तुलनेत १०३ टक्के म्हणजे सर्वसामान्य पाऊस पडणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. महाराष्ट्रामध्ये यंदाच्या हंगामात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार आहे.

हवामान विभागाने यापूर्वी १४ एप्रिलला मोसमी पावसाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला होता. त्यानुसार देशात सरासरीच्या तुलनेत ९९ टक्के पाऊस पडणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, सध्याची हवामानाची स्थिती लक्षात घेता पावसाच्या प्रमाणाचा अंदाज वाढवून तो १०३ टक्के करण्यात आला आहे. त्यात चार टक्के कमी-अधिक होण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे. १९७१ ते २०२० या कालावधीत भारतात पावसाची दीर्घकालीन सरासरी ८७ सेमी आहे. या सरासरीच्या तुलनेत मोसमाच्या चार महिन्यांत १०३ टक्के पाऊस देशात पडणार आहे.

Image

महाराष्ट्रात बहुतांश भागात चार महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. कोकण आणि किनारपट्टीच्या भागासह पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण सर्वसाधारण असणार आहे. मात्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र त्याचप्रमाणे मराठवाड्यातील बहुतांश भाग आणि विदर्भात तीन ते चार जिल्ह्यांमध्ये पावासाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याचे दिसून येत आहे. देशामध्ये मध्य भारत आणि दक्षिणेकडील भागात सामान्य ते सामान्यपेक्षा अधिक पाऊस असेल. उत्तर-पूर्व भारत आणि पश्चिम भारतामध्ये सर्वसाधारण पाऊस होणार आहे. पूर्वोत्तर भागातील मिझोरम, त्रिपुरा, मणिपूर आदी राज्यांमद्ये मात्र यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

केरळनंतर आता नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागात पोहोचला आहे. सध्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या पुढील मार्गक्रमणासाठी पोषक हवामान तयार झालं असून येत्या दोन ते तीन दिवसांत कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि कोकणातील काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे, याबाबतची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विटद्वारे दिली.