‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या २४ व्या दीक्षान्त समारंभामध्ये ५२ सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार

नांदेड ,३० मे /प्रतिनिधी :-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा चोविसावा दीक्षान्त समारंभ बुधवार दि. १ जून, २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये परीक्षेतील गुणवत्ताधारक गुणवंत विद्यार्थ्यांना ५२ सुवर्णपदक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. 

विद्यापीठाच्या चोविसाव्या दीक्षान्त समारंभास अध्यक्ष म्हणून राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती मा. श्री. भगत सिंह कोश्यारी हे अभासी (ऑनलाईन) पद्धतीने उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.ना. श्री. उदयजी सामंत राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग व महासंचालक डॉ. शेखर सी. मांडे उपस्थित राहणार आहेत. या बरोबरच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांची उपस्थिती असणार आहे.  

या दीक्षान्त समारंभामध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखाचे ८ सुवर्णपदक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. मानव्य विद्याशाखेतून २० सुवर्णपदक मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येणार आहेत. आंतरविद्याशाखीय अभ्यास शाखेमधील ३ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेमधील २१ सुवर्णपदक विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. असे एकूण ५२ सुवर्णपदक मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येणार आहेत. असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी कळविले आहे. 

या समारंभाच्या दुसऱ्या सत्रामध्ये दु. १:३० वा. नंतर पी.एचडी झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन आणि विद्यापीठातील संविधानिक अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.