देशभरात आतापर्यंत दीड कोटीपेक्षा जास्त नमुन्यांचे परीक्षण

नवी दिल्‍ली, 24 जुलै 2020

देशातील कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा एका दिवसातील दर गेले सलग तीन दिवस वाढतो आहे. सलग तिसऱ्या दिवशी, म्हणजे गेल्या 24 तासांत कोविडचे 34,602 उपचारानंतर बरे झाले आहेत.यामुळे बरे झालेल्या रुग्णांची आतापर्यंतची संख्या आठ लाखांच्या वर गेली असून सध्या ती 8,17,208 एवढी आहे. परिणामी कोविड रुग्ण बरे होण्याचा दर, 63.45%पर्यंत पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने देशातील सक्रीय रुग्णांच्या संख्येपेक्षा आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3,77,073 ने अधिक आहे.तसेच ही तफावत सातत्याने वाढते आहे. आज देशात 4,40,135 सक्रीय रुग्ण आहेत.  
कोरोना विषाणू संसर्गाचे निदान करण्यासाठी देशभरात आतापर्यंत दीड कोटीपेक्षा (1,54,28,170) जास्त नमुन्यांचे परीक्षण करण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत अशा 3,52,801 नमून्यांचे परीक्षण करण्यात आले. 

ही आकडेवारी लक्षात घेता भारतात आजवर प्रती दशलक्ष 11,179 चाचण्या केल्या गेल्या असून परीक्षणाच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.

परीक्षणासाठी प्रयोगशाळांच्या संख्येत करण्यात येणारी वाढ (आतापर्यंत 1290) तसेच विविध पर्यायांच्या माध्यमातून परीक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशांनी हाती घेतलेल्या उपाययोजनांमुळे भारतात प्रति दशलक्ष चाचण्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

आरटी-पीसीआर प्रयोगशाळा, या आयसीएमआरने अलिकडेच निर्धारित केलेल्या परिक्षण धोरणाचा कणा आहेत. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील प्रयोगशाळांच्या संख्येत वाढ दिसून येते आहे. सध्या 897 सरकारी तर 393 खाजगी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. याचे तपशील पुढीलप्रमाणे:

• रिअल टाईम आरटी-पीसीआर आधारित परिक्षण प्रयोगशाळा: 653 (सरकारी: 399 + खाजगी: 254)

• TrueNat आधारित परिक्षण प्रयोगशाळा: 530 (सरकारी: 466 + खाजगी: 64)

• CBNAAT आधारित परिक्षण प्रयोगशाळा: 107 (सरकारी: 32 + खाजगी: 75)

राज्यांनी चाचण्यांचा वेग वाढवावा

केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशात समन्वय ठेवून कोविड-19 च्या प्रतिबंधनासाठी केलेल्या उपाययोजना आणि नियोजनबद्ध, वर्गीकृत आणि समन्वयाच्या धोरणामुळे देशात कोविडचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढते आहे, तसेच मृत्यूदर देखील घटतो आहे.  मात्र, काही ठिकाणी गेल्या काही काळात कोविडचे रुग्ण वाढत असल्यामुळे, कोविड व्यवस्थापनाविषयीच्या नव्या चिंता निर्माण झाल्या आहेत.

कोविड व्यवस्थापन आणि प्रतिबंधनासाठी, केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वयीत धोरणाचा भाग म्हणून आज कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली, कोविडचे प्रमाण अधिक असलेल्या नऊ राज्यांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांची उच्चस्तरीय आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात आली. कोविडचे रुग्ण अधिक असलेल्या तेलंगणा, आंध्र, कर्नाटक, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांचे सचिव या बैठकीत सहभागी झाले होते.

यावेळी कॅबिनेट सचिवांनी कोविड प्रतिसाद धोरणाचा राज्यनिहाय आढावा घेतला. आरोग्य सचिव आणि इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून गेल्या काही काळात रुग्ण वाढत जाण्यामागची कारणे जाणून घेतली. सर्व राज्यांनी टेस्ट ट्रॅक ट्रॅक या धोरणाचा अवलंब करत, चाचण्यांची संख्या, विशेषतः प्रतिबंधित क्षेत्रात अधिक चाचण्या करण्यावर भर द्यावा अशी सूचना केंद्राने केली. काही राज्यात चाचण्यांचे प्रमाण कमी असल्याबद्द्ल यावेळी चिंता व्यक्त करण्यात आली.रुग्ण लवकर सापडण्यासाठी तसेच संक्रमण रोखण्यासाठी सातत्यपूर्ण आणि आक्रमक वेगाने चाचण्या करणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या निर्देशांनुसार प्रतिबंधित क्षेत्रांची योग्य आखणी करावी, यावर कॅबिनेट सचिवांनी भर दिला.प्रतिबंधित क्षेत्रात, रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे आणि घरोघरी जाऊन रुग्णांचे सर्वेक्षण यातून संक्रमण साखळी तोडता येईल, असे या बैठकीत सांगण्यात आले. प्रतिबंधित क्षेत्रांच्या बाहेर बफर क्षेत्र तयार करावे तसेच SARI/ILI या फ्लू सदृश तापाची साथ असलेल्या क्षेत्रांमध्ये सर्वेक्षण केले जावे, असेही सांगण्यात आले.

आरोग्याच्या सुविधा पुरेशा उपलब्ध करुन देण्यावर भर दिला जावा, असा सल्ला या राज्यांना देण्यात आला. त्यात, खाटांची संख्या, ऑक्सिजन, आणि व्हेंटीलेटर्सची उपलब्धता याकडे लक्ष दिले जावे, असे सांगण्यात आले. रुग्णांवर उपचार करतांना आरोग्य मंत्रालयाने सांगितलेल्या प्रोटोकॉलचे पालन केले जावे. तसेच रुग्णवाहिकांचे व्यवस्थापन करुन एकही रुग्ण, रुग्णवाहिकेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही बैठकीत सांगण्यात आले.कोविड रुग्णांचा मृत्यूदर कमी राखण्यासाठीच्या प्रयत्नांवर देखील कॅबिनेट सचिवानी भर दिला. त्यासाठी अधिक धोका असलेल्या लोकांची विशेष काळजी घेतली जावी, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजार असलेल्या लोकांकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

लवकर रुग्ण ओळखणे आणि त्यांच्यावर प्रभावी उपचार व्यवस्थापन हीच कोविडचे संक्रमण रोखण्याची गुरुकिल्ली आहे, याकडे या सर्व राज्यांचे लक्ष वेधण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *